रोजच्या रटाळ मालिकांना कंटाळलेले प्रेक्षक आता वेबसिरीजकडे वळत आहेत. त्यामुळे आता कलाकारही एक-दोन वर्ष मालिकांचं शूटिंग करण्यापेक्षा दोन तीन महिन्यांची वेब सिरीज करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे साहजिकच निर्मातेही वेबसिरीज करण्यासाठी आग्रही झाले आहेत. यात प्रामुख्याने एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे अभिनेत्री मनवा नाईक. मनवाने देखील आता वेबसिरीजची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेच्या निर्मितीनंतर मनवा आता वेबसिरीजच्या निर्मितीकडे वळली आहे. मनवाबरोबरच या वेबसिरीजची निर्मिती वृषाली शिंदे आणि शिवांगी केणी देखील करत आहेत. ही वेबसिरीज अतिशय वेगळ्या विषयावर तयार केली जात आहे. मात्र यामध्ये कोणकोणते कलाकार असतील, नेमका काय विषय असेल याबाबत मात्र सध्या गुप्तता पाळण्यात आली आहे. लवकरच मनवा या सगळ्या गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करेल.
झी मराठीवरील 'चूक भूल द्यावी घ्यावी', या मालिकेची निर्मिती मनवाने केली होती. एक वेगळ्या धाटणीच्या कॉमेडी मालिकेत दिलीप प्रभावळकर, सुकन्या कुलकर्णी हे प्रमुख भूमिकेत होते. मनवाची निर्मिती असणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सध्या कलर्स मराठीवर सुरू असणारी 'सरस्वती' या मालिकेची निर्मितीही मनवानेच केली आहे.
अभिनेत्री मनवा नाईकनं 'पोर बाजार' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं.
मनवाने मालिका, नाटकांबरोबरच अनेक चित्रपटातही काम केलं आहे. तिच्या सगळ्याच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. 'जाऊ द्याना बाळासाहेब', 'फक्त लढ म्हणा', 'नो एंन्ट्री पुढे धोका आहे' अशा मराठी चित्रपटांसोबतच तिने 'जोधा अकबर' या हिंदी चित्रपटातही आपली छाप पाडली. त्याचबरोबर 'बा बहू और बेबी', 'तीन बहुरानीय' या हिंदी मालिकेतील मनवाच्या कामाचं आजही कौतुक होत आहे.