Advertisement

आयुष्य समृद्ध करणारी 'सायकल' छोट्या पडद्यावर!


आयुष्य समृद्ध करणारी 'सायकल' छोट्या पडद्यावर!
SHARES

विविध पुरस्कार सोहळे आणि चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला एखादा चित्रपट जेव्हा टेलिव्हीजनवर दाखवला जाणार असतो, तेव्हा त्याचं सर्वांनाच आकर्षण असतं. देशभरातील सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'सायकल' या मराठी चित्रपटाचा टेलिव्हीजन प्रीमियर २५ नोव्हेंबरला होणार आहे.


येत्या रविवारी भेटीला

येत्या रविवारी 'सायकल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये भालचंद्र कदम, प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिल पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.
विविध पुरस्कारांवर नाव कोरत आणि परदेशातही सफर करून आलेल्या सायकलची गोष्ट कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. आयुष्याला समृद्ध करणाऱ्या एका 'सायकल'चा प्रवास अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.


काय आहे सिनेमाची कथा?

'सायकल' ही एक हलकीफुलकी कथा असून, या चित्रपटाद्वारे प्रत्येकजण स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू करेल. हा चित्रपट प्रेक्षकांना भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. यात स्वत:च्या सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखेचं केशवचं हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी अचानक केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात.

यामुळे केशव अत्यंत निराश होतो. परंतु त्याला आशा आहे की सायकल नक्की परत मिळेल. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना तो कसा अनभिज्ञपणे चोरांना भेटतो? प्रवासादरम्यान त्या चोरांचं आयुष्य कसं बदलतं? केशवला त्याची सायकल परत मिळते का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत.


प्रकाश कुंटेंचं दिग्दर्शन

'कॉफी आणि बरंच काही', 'अँड जरा हटके' आणि 'हंपी' या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा चित्रपट चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तर प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम या नामवंत कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकतो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा