Advertisement

‘ड्राय डे’ नव्हे, दारू’डे’

या सिनेमाची कथा दिग्दर्शकाने ड्राय डेच्या माध्यमातून सादर केली असली, तरी ती केवळ दारू आणि दारूभोवतीच फिरते. ब्रेकअप झालं की दारू प्यायलीच पाहिजे, मग तो ड्राय डे असला तरी बेहत्तर हा विचारच जणू या सिनेमाद्वारे तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘खुशी हो या गम, दारू के संग झूम’ असा काहीसा मंत्रच हा सिनेमा तरुणाईला देतो.

‘ड्राय डे’ नव्हे, दारू’डे’
SHARES

सिनेमा माध्यम समाजमनाचा आरसा असल्याचं म्हटलं जातं. प्रत्येक दिग्दर्शक या आरशात कोणतं ना कोणतं प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कधी तरुणाईचं, तर कधी प्रेमाचं... कधी वास्तववादी, तर कधी काल्पनिक... पण, पडद्यावर जे काही दाखवण्यात येतं त्याचा समाजावर आणि भावी पिढीवर काय परिणाम होईल याचा सारासार विचारही होणंही गरजेचं असतं. तसा कुठलाही विचार न करता या सिनेमात दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी तरुणाईला पटेल आणि आवडेल असा ‘ब्रेकअप’ आणि ‘ब्रेकअप के बाद’चा मुद्दा मांडला आहे.

या सिनेमाची कथा दिग्दर्शकाने ड्राय डेच्या माध्यमातून सादर केली असली, तरी ती केवळ दारू आणि दारूभोवतीच फिरते. ब्रेकअप झालं की दारू प्यायलीच पाहिजे, मग तो ड्राय डे असला तरी बेहत्तर हा विचारच जणू या सिनेमाद्वारे तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘खुशी हो या गम, दारू के संग झूम’ असा काहीसा मंत्रच हा सिनेमा तरुणाईला देतो.



एका काॅलेजमधील दगडावर कोणीतरी दारूची बाटली फोडतं आणि प्रोफेसर पंकज (योगेश सोहोनी) संपूर्ण वर्गाला ते साफ करायला लावतो. त्यावेळी पंकज भूतकाळात रमत मित्राचा ब्रेकअप झाल्यावर आपण कशी दारू प्यायलो होतो, त्याची कथा सांगतो. पंकजचा मित्र अजयचं (रित्विक केंद्रे ) पल्लवी (मोनालिसा बागल) नावाच्या मुलीवर प्रेम असतं, पण काही कारणावरून त्यांचं ब्रेकअप होतं.

पल्लवीला समजावण्यासाठी गेलेला अजय रस्त्यातच तिच्या गाडीची चावी काढून घेतो. त्यानंतर ती गाडी तिथून गायब होते. पंकजच्या मदतीने अजय गाडी शोधायला सुरुवात करतो. गाडी चोरीला गेली असेल या विचाराने दोघेही चोर गण्याकडे (कैलास वाघमारे) येतात. अजयचं ब्रेकअप झाल्याचं समजल्यावर ती रात्र दारू पिऊन साजरी करायला हवी असं गण्या म्हणतो.



नेमका तो ड्राय डे असतो. तरीही गण्या दारूच्या बाटलीची जुळवाजुळव करतो. ती संपल्यावर दुसरीही बाटली मिळवतो. अशा प्रकारे ड्राय डेच्या रात्री आपण दारू पिऊन कसा धिंगाणा घातला होता ते पंकज आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो.

मूळात सिनेमाच्या कथेला काहीच ठोस बेस नसल्याने तकलादू पायावर उभारलेली पटकथा या सिनेमात आहे. फ्लॅशबॅकमध्ये कथा सांगताना त्यातही सिनेमा बऱ्याचदा फ्लॅशबॅकमध्ये जातो. एक प्रोफेसर आपल्या विद्यार्थ्यांना मीही दारू प्यायला होतो आणि इतकी प्यायलो होतो की भानावरच नव्हतो हे विद्येच्या मंदिराच्या आवारात बसून रंगवून सांगत असल्याचं पाहून धन्य तो गुरू आणि धन्य ते शिष्य असंच म्हणावंसं वाटतं.

दिग्दर्शकाला सिनेमात नेमकं काय सांगायचं आहे तेच समजत नाही. विचार, संदेश, अंडरकरंट मेसेज हे सगळं झूठ आहे. ब्रेकअप झालं की दारू प्या आणि दंगा-मस्ती करा, हेच काय ते ठासून सांगण्यात आलं आहे. सिनेमातील लांबच लांब, कंटाळा येईस्तोवर न संपणारी दृश्यं बोअर करतात. उगाच टाइमपास सुरू असल्यासारखं वाटतं. ड्राय डेला दारू पिऊ नका, असं हा सिनेमा सांगतो की, दारू पिण्यासाठी कशी जुळवाजुळव करायची ते शिकवतो हे दिग्दर्शकच जाणे.



विषय तरुणाईच्या आवडीचा असल्याने त्यांचा कौल या सिनेमाला मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही. ‘दारू डिंग डांग...’ हे गाणं तसं थिल्लर असलं तरी तरुणाईला आवडणारं आहे. इतर गाण्यांची मात्र बोंब आहे. रोमँटिक गाण्यातील लोकेशन्स छान आहेत. कॅास्च्युमकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. इतर गोष्टी सामान्यच आहेत.

मुख्य भूमिकेत रित्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल ही जोडी तितकीशी प्रभावी वाटत नाही. मोनालिसाचा अभिनय म्हणजे चेहऱ्यावर कोरी पाटी आणि रट्टा मारलेले संवाद इतकाच आहे. रित्विकने थोडा फार प्रयत्न केला असला तरी नायकाकडून असलेल्या अपेक्षा तो पूर्ण करू शकलेला नाही.

याउलट कैलास वाघमारेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. चोर असलेल्या गण्याच्या भूमिकेत त्याने आपल्या परीने रंग भरण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. योगेश सोहोनीनेही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. चिन्मय कांबळी, अरुण नलावडे, पार्थ घाडगे, आयली घिया यांच्या भूमिका फार छोट्या आहेत.

प्रत्येक सिनेमा काही तरी देऊन जातो, पण या सिनेमाकडे तसं काही देण्यासारखंही नाही आणि प्रेक्षकांनी यातून काही घेण्यासारखंही नाही. त्यामुळेच असे सिनेमे केवळ टाइमपास म्हणून पाहिले जातात.

दर्जा - *1/2

........................................

सिनेमा- ‘ड्राय डे

निर्माता- संजय पाटील

दिग्दर्शन, कथा- पांडुरंग जाधव

कलाकार- मोनालिसा बागल, रित्विक केंद्रे, पार्थ घाडगे, आयली घिया, चिन्मय कांबळी, योगेश सोहोनी, कैलाश वाघमारे, अरुण नलावडे



हेही वाचा-

जो थांबला, तो संपला!

हृषिकेशचा ‘होम स्वीट होम’मध्ये गृहप्रवेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा