Advertisement

हृषिकेशचा ‘होम स्वीट होम’मध्ये गृहप्रवेश


हृषिकेशचा ‘होम स्वीट होम’मध्ये गृहप्रवेश
SHARES

अलिकडच्या काळात बऱ्याच कलाकारांची पावलं दिग्दर्शनाकडे वळत आहेत. लेखन आणि अभिनयाच्या जोडीला सिनेमाचं कथानक आपल्याच शैलीत मांडण्यासाठी अभिनेता हृषिकेश जोशीही दिग्दर्शनाकडे वळला आहे.

हृषिकेश जोशी हे नाव उच्चारताच कोणत्याही व्यक्तिरेखेशी एकरूप होणारा, नकळतपणे कोणत्याही बोलीभाषेत रुळणारा, सहजपणे विनोदनिर्मिती करण्याचं कौशल्य असलेला हरहुन्नरी चेहरा अनाहुतपणे डोळ्यांसमोर येतो. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’पासून आजपर्यंतच्या हृषिकेशच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास याची सहज प्रचिती येते. हाच हृषिकेश आता त्याच्या चाहत्यांना दिग्दर्शकाच्या रूपात भेटणार आहे. स्वभावाप्रमाणेच हृषिकेशने अगदी गोड शीर्षक असलेल्या ‘होम स्वीट होम’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘होम स्वीट होम’च्या निमित्ताने हृषिकेशने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.


दिग्दर्शन करायचंच होतं

सिनेमा दिग्दर्शनाविषयी विचारलं असता हृषिकेश म्हणाला की, दिग्दर्शन हे कधीतरी करायचंच होतं.  पण हा सिनेमा काहीसा अनपेक्षितपणेच दिग्दर्शनासाठी आला. या सिनेमाच्या लिखाणाचं काम माझ्याकडं आलं होतं. यात मी अभिनयही करणार हे ठरलं होतं. पण दिग्दर्शनही मीच करेन असं त्यावेळी मलाही ठाऊक नव्हतं. सिनेमाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर यांना सिनेमाचं लिखाण खूपच भावलं आणि त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली.


कथा ओरिजनल आहे

सिनेमाचं शीर्षक ‘होम स्वीट होम’ असं परिचयाचं वाटणारं असलं तरी कथा मात्र पूर्णपणे ओरिजनल नाही. कोणत्याही कलाकृतीवर किंवा साहित्यावर आधारित नसून पूर्णत: काल्पनिक आहे. त्यामुळे या सिनेमात प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी काहीशा नव्या शैलीत पाहायला मिळतील.


विषय घरासंबंधीचा

अतिशय साधा, सरळ आणि सोपा असा रोजच्या जीवनातील विषय मनोरंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. माणसांचं घराशी नातं, घरातल्यांचं घरातल्याशी आणि घराशी संबंधित सर्वांचंच नातं यात अधोरेखित करण्यात आलं आहे. जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या घराचं स्थान आपल्या आयुष्यात काय असतं हे दाखवताना नाती आणि स्वप्नांचा वेध घेण्यात आला आहे. ही गोष्ट सांगता येणारी नसून, त्याचा अनुभवता येणारी आहे.


लेखन-दिग्दर्शन-अभिनय

कथा मी लिहिली आहे. पटकथाही मी वैभव जोशीसोबत लिहिली आहे आणि संवाद मुग्धा गोडबोलेचे आहेत. पण एकूण लिखाणाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी सहभागी होतो. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी भूमिका या सिनेमाच्या निमित्ताने साकारली आहे.


मध्यमवर्गीयाच्या भूमिकेत

निम्नमध्यमवर्गीयांचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तिरेखा मी साकारली आहे. नाव सोपान शिंदे असलेला हा सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे. जगातील कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीला तो आपलंच प्रतिबिंब आहे असं वाटावा असा आहे. ही गोष्ट अमूक एका शहरात घडणारी नसल्याने सर्वभाषिक प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी आहे.


रीमाताईंचा शेवटचा सिनेमा

दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी अभिनय केलेला ‘होम स्वीट होम’ हा शेवटचा सिनेमा ठरला आहे. या सिनेमात त्यांच्या जोडीला हृषिकेश, मोहन जोशी, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, प्रसाद ओक, क्षिती जोग आदी मराठीतील आघाडीचे कलाकारही आहेत. आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार यांची प्रस्तुती असलेला हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

‘रमाई’च्या रूपात भेटणार ‘लालबागची राणी’

बिग बॉसमध्ये कोणते पाहुुणे येणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा