Advertisement

‘रमाई’च्या रूपात भेटणार ‘लालबागची राणी’

‘लालबागची राणी’ या सिनेमामध्ये वीणा जामकरने साकारलेली व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहणारी आहे. आता हीच लालबागची राणी ‘रमाई’च्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.

‘रमाई’च्या रूपात भेटणार ‘लालबागची राणी’
SHARES

कारकिर्दीत एकदा तरी एखादी ऐतिहासिक भूमिका साकारता यावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. पण सर्वांचंच हे स्वप्न साकार होत नाही. ‘रमाई’ या आगामी मराठी सिनेमामुळे अभिनेत्री वीणा जामकरचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील काही संवेदनशील कलाकार नेहमीच नाविन्याच्या शोधात असतात. अशापैकीच एक आहे अभिनेत्री वीणा जामकर. केवळ मुख्य भूमिकांमध्येच नव्हे, तर सहाय्यक भूमिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत पुरस्कारांना गवसणी घालण्याची शक्ती असलेल्या वीणाची विविधांगी भूमिका जणू वाटच पाहत असतात की काय? असा प्रश्न पडावा, असं तिचं करियर आहे. ‘लालबागची राणी’ या सिनेमामध्ये वीणाने साकारलेली व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहणारी आहे. आता हीच लालबागची राणी ‘रमाई’च्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. ‘मुंबई लाइव्ह’शी दिलखुलास गप्पा मारताना वीणाने लालबागची राणी ते रमाईच्या प्रवासाबाबत सांगितलं.


लालबागची राणी ते रमाई

‘लालबागची राणी’ या सिनेमातील भूमिका म्हणजे एक वेगळाच अनुभव असल्याचं सांगत थेट ‘रमाई’बाबत वीणा म्हणाली की, लालबागची राणी अल्लड होती. पण रमाई बालपणापासूनच मॅच्युअर होत्या. ती मोठी झाली तरी लहानच होती. पण रमाईंना बालपणीच मोठेपणीच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिरेखा परस्पर विरोधी आहेत. दोन भिन्न टोकं आहेत.


प्रथमच ऐतिहासिक भूमिकेत

यापूर्वी कधीही ऐतिहासिक भूमिका साकारण्याचा योग आला नाही. या सिनेमाचे दिग्दर्शक बाळ बरगाले यांच्यामुळे ही संधी लाभली. आजवर वास्तववादी भूमिकाच साकारल्या आहेत. ‘तुकाराम’ या सिनेमात त्यांची पहिली पत्नी रखमाची भूमिका साकारली होती. पण तीही काल्पनिकच म्हणावी लागेल. कारण त्यांच्याबाबत फारसं कुठे काही लिहिलेलं नाही. त्यामुळे रमाबाईंची ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी पहिलीच ऐतिहासिक भूमिका ठरली आहे.


कशा गवसल्या रमाई?

याआधी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वाचलं होतं. पण ‘रमाई’च्या निमित्ताने रमााबाई आंबेडकर या थोर महिलेचा संघर्ष जाणून घेता आला. या सिनेमासाठी दोघांचीही जीवनचरित्रं वाचली, तेव्हा ती माणसं कशी होती याची प्रचिती आली. मनाला चटका लावणारं जीवन जगणारी ही माणसं जगात क्रांती घडवण्यासाठीच जन्माला आली होती हे जाणवलं आणि मग रमाबाई साकारणं सोपं गेलं.


अशा होत्या रमाई

डाॅ.  बाबासाहेबांच्या कारकिर्दीत रमाबाईंचा फार मोलाचा वाटा आहे. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले होते, तेव्हा रमाईंनी स्वबळावर संसार सांभाळला. प्रतिकूल परिस्थितीतही बाबासाहेबांना त्यांच्या कार्यापासून कधीही ढळू दिलं नाही. कधीच कोणत्या बाबतीत अडवलं नाही. तीन मुलं दगावली, तरी खचल्या नाहीत. बाबासाहेबांच्या कार्यात आणि स्वत:च्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.


बालपणापासून अखेरपर्यंतचा काळ

या सिनेमात रमाबाईंचा बालपणापासून अखेरपर्यंतचा काळ पाहायला मिळेल. त्यांचं बालपण कोकणात गेल्याने तिथेही या सिनेमाच्या काही भागाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. बाबासाहेब आणि रमाबाई या दोन महान व्यक्तिरेखांचे ट्रॅक्स या सिनेमात आहेत. या सिनेमातील काही सीन्स खूपच भावूक करणारे आहेत. बाबसाहेब आणि रमाबाई यांची तत्त्व आणि विचारांची ही कहाणी असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.


संवेदनशील दिग्दर्शक

या सिनेमाचे दिग्दर्शक बाळ बरगाले यांना माझ्यात रमाबाई दिसल्या आणि पुन्हा एकदा एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी लाभली. बाळ यांनी यापूर्वी बरंच काम केल्याने खूप अनुभवी आहेत. अतिशय संवेदनशील, हुषार आणि सर्वांना समजून घेऊन शांततेत काम करणारे दिग्दर्शक असं त्यांच्याबाबत माझं मत आहे.



हेही वाचा -

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!

बिग बॉसमध्ये कोणते पाहुुणे येणार?



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा