Advertisement

हॉस्टेलची मज्जा १२ जानेवारीला अनुभवा


हॉस्टेलची मज्जा १२ जानेवारीला अनुभवा
SHARES

'बावरे प्रेम हे', 'लग्न पाहावे करून' आणि 'सतरंगी रे' यांसारखे चित्रपट गाजवणारे प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक आता पुन्हा एकदा 'हॉस्टेल डेज' या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी मुंबईसह महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


काय आहे सिनेमाची कथा?

या चित्रपटाची कथा ही १९९४ मधील साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलवर आधारीत आहे. १९९० च्या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेत फार मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी येवू लागले. तसेच समाजामध्ये फार मोठे बदल झाल्यामुळे महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. 'हॉस्टेल डेज’ मध्ये हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडण्यात आली आहे.


हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी आठवण असते. ज्यांनी हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल लागून राहिलेलं असतं.
- अजय नाईक, दिग्दर्शक

'हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटात एकूण आठ गाणी आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीच्या गायकांनी ती गाणी गायली आहेत.


हॉस्टेल डेजमधून विराजसची चित्रपट सृष्टीत पदार्पण

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी 'हॉस्टेल डेज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. विराजसने रंगभूमी आणि चित्रपट या अभ्यासक्रमात पदवी मिळवणारी आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून विराजसने कला आणि चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या आधी विराजसने अभिनयाबरोबर दिग्दर्शनही केलं आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा माधव या चित्रपटात त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. संहिता लेखनामध्येही विराजसने प्रशिक्षण घेतलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा