Advertisement

एका चुकलेल्या 'मंत्रा'ची कहाणी!

चित्रपटासाठी निवडलेला विषय हा उत्तम आहे. मात्र, पटकथा तितकीशी सुसंगत वाटत नाही. आस्तिक आणि नास्तिक यातील नेमका फरकच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. मध्यांतरापर्यंत चित्रपट आजचा तरूण कसा पौरोहित्य करायला तयार होत नाही, या विषयाभोवती फिरत असतो. आणि मध्यांतरानंतर अचानकच चित्रपटात आस्तिक नास्तिक वाद सुरू होतो.

एका चुकलेल्या 'मंत्रा'ची कहाणी!
SHARES

या जगात देव आहे की नाही हे प्रत्येकजण त्याला आलेल्या अनुभवांवरून ठरवतो. त्यावरूनच तो आस्तिक आहे की नास्तिक हे ठरतं. मंत्र हा सिनेमा काहीसा याच आशयावर आधारीत आहे. विषय उत्तम असला, तरी तो तसाच पोहोचवण्यात चित्रपट अपयशी ठरतो.

पुण्यात घडलेली ही कथा...श्रीधरपंत (मनोज जोशी) हे पिढीजात चालत आलेला पौरोहित्याचा व्यवसाय करत असतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा काशिनाथही (पुष्कराज चिरपुटकर) पौरोहित्यच व्यवसाय म्हणून निवडतो. निरंजनने निवडलेल्या त्याच्या या व्यवसायामुळे त्याला लग्नासाठी मुलींकडून कायम नकारघंटाच ऐकावी लागते. मात्र काशिनाथ याचा धाकटा भाऊ निरंजन (सौरभ गोगटे) याला फारशी पौरोहित्य करण्याची आवड नसते. त्याचा कल सीए करण्याकडे असतो.काशीनाथला लहानपणापासूनच इंग्रजी विषयी भिती असते. अशातच जर्मनीच्या एका मंदिरात पुजारी म्हणून जाण्याची ऑफर काशिनाथकडे येते. आपल्या भावावर आलेलं संकट निरंजन स्वत:वर घेतो. निरंजन जर्मनीला जाऊन मंदिरात काम करायचं ठरवतो. यासाठी तो जर्मनचा क्लासही लावतो. क्लासमध्ये त्याची ओळख अंतरा (दिप्ती देवी) हिच्याशी होते. हळूहळू निरंजन अंतराच्या प्रेमात पडतो. मात्र नास्तिक असलेल्या अंतरापासून तो आपण पौरोहित्य करत असल्याचं लपवतो. आणि अंतराचा हाच टोकाचा नास्तिकपणा निरंजनचा घात करतो.

चित्रपटासाठी निवडलेला विषय हा उत्तम आहे. मात्र, पटकथा तितकीशी सुसंगत वाटत नाही. आस्तिक आणि नास्तिक यातील नेमका फरकच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. मध्यांतरापर्यंत चित्रपट आजचा तरूण कसा पौरोहित्य करायला तयार होत नाही, या विषयाभोवती फिरत असतो. आणि मध्यांतरानंतर अचानकच चित्रपटात आस्तिक नास्तिक वाद सुरू होतो.अंतराची भूमिका करणाऱ्या दिप्ती देवीने अभिनय उत्तम केला आहे. पण मुळातच अंतराचं पात्र कन्फ्युज्ड वाटतं. एकीकडे अंतरा आस्तिक लोकांना नावं ठेवतं असते. मात्र टोकाची नास्तिक असलेल्या अंतराचं टोकाची अस्तिक असणाऱ्या आजीशी मात्र छान जमतं. अनेक प्रसंगांमध्ये अंतरा नास्तिक नसून आगाऊ वाटते. त्याचप्रमाणे अनेक प्रसंग इथे का आहेत? असाही प्रश्न पडतो. शिवाय अंतराच्या तोंडी असलेली वाक्य ही केवळ तिच्या नास्तिकतेबाबत नाहीत, तर आस्तिक माणूस कसा मूर्ख असतो, हेच ठसवणारी वाटतात.

चित्रपटाच्या शेवटी मनोज जोशी यांचा तब्बल १५ मिनिटांचा मोनोलॉग कंटाळवाणा होतो. गेले २ तास चित्रपटात जो विषय मांडला गेला आहे, तो पुन्हा एकदा मनोज जोशी यांच्या तोंडून ऐकताना नकोसा होतो. चित्रपटातील गाणीही असंबद्ध झालीयेत. महत्त्वाचा विषय सुरू असताना मध्येच उगवल्या सारखी वाटतात. अनेक ठिकाणी पार्श्वसंगीतही कर्कश्श्य झालं आहे. खासकरून निरंजन मंत्रोच्चार शिकत असतानाचं पार्श्वसंगीत कानांना नकोसं होतं.चित्रपट संकलनामध्येही थोडा फसला आहे. काही प्रसंग नको इतके लांबले आहेत, तर चित्रपटातील महत्त्वाच्या प्रसंगांना उगाचच कात्री दिली गेली आहे.

चित्रपटात सगळ्यांची कामं उत्तम झाली आहेत. सौरभ गोगटे (निरंजन) याचे मंत्रोच्चार अतिशय स्पष्ट आहेत. कुठेही तो नवीन शिकलाय असं वाटत नाही. मात्र उत्तम कथा आणि उत्तम अभिनय असतानाही लेखकाला आणि दिग्दर्शकालाही हा विषय उत्तमरीत्या मांडता आला नाही. त्यामुळे उगाचच या भरकटलेल्या आस्तिक-नास्तिक वादात जर तुम्हाला अडकायचं नसेल, तर हे 'मंत्र' न ऐकलेलेच बरे!
Movie - Mantra

Actors - Manoj Joshi, Dipti Devi, Saurabh Gogte, Pushkaraj Chirputkar

Ratings - 1.5/5


संबंधित विषय
Advertisement