Advertisement

स्टारडमच्या झगमगाटात हरवलेल्या साजिरीची परीकथा

लहान मुलांवर आधारित असलेले आजवर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी हा सिनेमा वेगळ्या मार्गाने जात त्यांच्या मनात दडलेले भाव सादर करतो. सिनेमाचा मुद्दा प्रत्येक घरातील असून सर्वच पालक आणि मुलांची मानसिक अवस्था दर्शवणारा असला तरी, पटकथा आणि मांडणीमध्ये राहिलेल्या त्रुटींमुळे विशेष प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत नाही.

स्टारडमच्या झगमगाटात हरवलेल्या साजिरीची परीकथा
SHARES

माणूस कितीही मोठा झाला तरी ‘बालपण देगा देवा...’ असं म्हणत बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमत असतो. पण आजच्या स्पर्धेच्या युगात हे बालपणच हरवलं असेल, तर त्या मुलांनी मोठं झाल्यावर बालपणीच्या कुठल्या आठवणीत रमायचं? हा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाारखा प्रश्न आहे. दिग्दर्शक रोहित शिलवंतने ‘परी हूं मैं’ या सिनेमात आजच्या पिढीतील मुलांच्या बालपणावर प्रकाश टाकत त्यांच्या मनातील उलाढाल सादर केली आहे.

लहान मुलांवर आधारित असलेले आजवर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी हा सिनेमा वेगळ्या मार्गाने जात त्यांच्या मनात दडलेले भाव सादर करतो. सिनेमाचा मुद्दा प्रत्येक घरातील असून सर्वच पालक आणि मुलांची मानसिक अवस्था दर्शवणारा असला तरी, पटकथा आणि मांडणीमध्ये राहिलेल्या त्रुटींमुळे विशेष प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत नाही.



कथा काय?

ही कथा आहे साजिरी दिघे (श्रुती निगडे) या लहानग्या मुलीची. तिचे बाबा माधव (नंदू माधव) विमा पाॅलिसी विकत असतात, तर आई कल्पना (देविका दफ्तरदार) गृहिणी असते. शाळेतील एका नाटिकेत राजकुमारी बनलेल्या साजिरीच्या अभिनयाचं कौतुक होतं आणि तिला ‘परी हूं मैं’ या मालिकेत शीर्षक भूमिका साकारण्याची संधी मिळते. साजिरीची आई यासाठी तयार नसते, पण तिच्या बाबंना साजिरीला मालिकेत पाहायचं असतं. त्यामुळे ते साजिरीला मोठमोठी स्वप्नं दाखवून मालिकेत काम करण्यासाठी तयार करतात.


ग्लॅमरचं जग

आॅडिशन होते, सिलेक्शन होतं, मालिका सुरूही होते. या मालिकेतील परीची आई (फ्लोरा सैनी) आणि परीची केमिस्ट्री हिट होते. साजिरी स्टार बनते. साजिरीच्या बाबांचं स्वप्न साकार होतं आणि त्यासोबतच पैसे कमावण्याची त्यांची हावही वाढते. साजिरीसोबतच ते देखील ग्लॅमरच्या जगात हरवून जातात. साजिरीची शाळा, मित्रमैत्रीणी, अभ्यास सर्व मागे पडतो आणि तीही कॅमेऱ्यालाच मित्र मानू लागते. कालांतराने मालिकेत बदल होतात आणि मालिकेतून साजिरी बाहेर पडते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं.



पटकथा कमकुवत

सिनेमाचा विषय खूप चांगला असून, आजच्या पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. पण केवळ विषय चांगला असून उपयोगाचा नाही, त्यासाठी पटकथेची मजबूत बांधणी करणं गरजेचं असतं. या सिनेमाच्या बाबतीत हीच मोठी चूक झाल्याने सिनेमा तुटक तुटक वाटतो. पुढे काय घडणार याची चाहूल जेव्हा अगोदरच लागते तेव्हा शेवटपर्यंत तो सिनेमा पाहणं ही केवळ औपचारिकता उरते. या सिनेमाचा विषय आणि त्यातील आश्वासक मुद्दा हृदयाला भिडणारा असला तरी सिनेमा या माध्यमात तो आणखी ठळकपणे सादर करण्याची आवश्यकता होती.


मुलांवर दबाव

आपला मुलगा सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये अव्वल यावा यासाठी आजचे पालक मुलांवर खूपच दबाव टाकत आहेत. रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून हे सत्य यापूर्वीच समोर आलं आहे. केवळ रिअॅलिटी शोजमध्ये सहभागी होणारी मुलंच नाहीत, तर इतर सर्वसामान्य मुलांच्या मनावरही स्पर्धेचं खूप मोठं दडपण आणि पालकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. या ओझ्याखाली दबलेल्या मुलांची अवस्था काय होऊ शकते याची झलक या सिनेमात पाहायला मिळते.



तांत्रिक बाबी ठिकठाक

‘काम तो मिलता रहेगा, लेकिन ये बचपन कहीं न चला जाए...’ तसंच ‘माधव तू तुझ्या अपेक्षांचं ओझं तिच्यावर लादतोयस...’ यांसारखे काही संवाद सिनेमाचं सार सांगण्याचं काम चोख करतात. शीर्षकगीत चांगलं झालं आहे. ‘वेगे वेगे धावू...’ हे शंकर महादेवन यांच्या आवाजातील गीतही छान आहे. सिनेमाच्या तांत्रिक बाबी ठिकठाक आहेत.


अभिनय जमेची बाजू

कलाकारांचा अभिनय ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. नंदू माधव आणि देविका दफ्तरदार हे दोन मोठे कलाकार यात आहेत. त्यांच्याकडून चांगलं काम होणार यात शंकाच नव्हती, पण चिमुकल्या श्रुती निगडेही जबरदस्त अभिनय करत लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. लहानसहान दृश्यांमधील बारीकसारीक गोष्टीही तिने चांगल्या प्रकारे सादर केल्या आहेत. नंदू माधव पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत हिट आहेत. देविका दफ्तरदार यांनी साकारलेली साजिरीची खरी आई आणि फ्लोरा सैनीने साकारलेली आॅनस्क्रीन आईही छान झाली आहे.



कलाकारांनी जीव ओतून मेहनत घेतली असली तरी लेखन-दिग्दर्शनातील त्रुटींमुळे या सिनेमातील अत्यंत महत्त्वाचा असलेला मुद्दा तितक्या प्रभावीपणे समोर येत नाही. पण आपण कुठे चुकतो आहोत आणि आपल्यात कुठे बदल घडवण्याची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.

दर्जा : **१/२

...........................................

चित्रपट: परी हूं मैं

निर्माता: डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, शीला सिंह

पटकथा: मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत, संकेत माने

दिग्दर्शक: रोहित शिलवंत

कलाकार: नंदू माधव, श्रुती निगडे, देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, विशेष भूमिका - मंगेश देसाई, मेघना एरंडे



हेही वाचा-

रिमा-मोहन यांच्या ‘होम स्वीट होम’चा काव्यमय टीझर

‘माझा अगडबम’च्या शीर्षकगीताने ‘थरथरलं आसमान’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा