Advertisement

तुकाबाबाच्या भेटीची आस अन् पुष्पक विमानाचा ध्यास

सिनेमाची कथा साधी सरळ आहे. त्यात रोमांचकारी प्रसंग आणि किस्से गुंफून उत्कंठावर्धक पटकथा लिहिली आहे. आजोबा आणि नातू यांच्यावर आधारित असलेला हा पहिला चित्रपट नसला तरी यापूर्वी कधीही न उलगडलेले पैलू या सिनेमात अधोरेखित करण्यात आल्याचं नक्कीच म्हणता येईल. खुमासदार संवाद आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयाच्या बळावर वैभवने हे पुष्पक विमान आकाशात उंच उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुकाबाबाच्या भेटीची आस अन् पुष्पक विमानाचा ध्यास
SHARES

मानवी जीवनाचा गोतावळा विविध नात्यांनी बनलेला आहे. यात बरीच नाती आहे. या गोतावळ्यातील आजोबा हे लक्षवेधी, तर नातू हे लाडकं व्यक्तिमत्व. यांचं नातं फार गोड आहे. थेट मथली पिढी गाळून एकमेकांशी ऋणानुबंध जोडणारं. या सिनेमात नवोदित दिग्दर्शक वैभव चिंचळकरने याच नात्याची सांगड तुकाबाबांच्या भेटीची आस आणि पुष्पक विमानात बसण्याचा ध्यास लागलेल्या तात्यांशी घातली आहे.


उत्कंठावर्धक पटकथा

सिनेमाची कथा साधी सरळ आहे. त्यात रोमांचकारी प्रसंग आणि किस्से गुंफून उत्कंठावर्धक पटकथा लिहिली आहे. आजोबा आणि नातू यांच्यावर आधारित असलेला हा पहिला चित्रपट नसला तरी यापूर्वी कधीही न उलगडलेले पैलू या सिनेमात अधोरेखित करण्यात आल्याचं नक्कीच म्हणता येईल. खुमासदार संवाद आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयाच्या बळावर वैभवने हे पुष्पक विमान आकाशात उंच उडवण्याचा प्रयत्न केला आहे.



'अशी' आहे कथा

खेडेगावात राहणाऱ्या तात्या (मोहन जोशी) यांची ही कथा आहे. तात्या हे खरं तर किर्तनकार. तुकाबाबा म्हणजेच तुकाराम महाराज आणि त्यांना वैकुंठात नेण्यासाठी आलेल्या पुष्पक विमानाची कथा रंगवून सांगण्यात धन्यता मानणारे असे हे तात्या. वयोमानाप्रमाणे थोडेसे विसराळू झालेले. दररोज बस थांब्यावर जाऊन येणाऱ्या एसटीत आपला नातू विलास (सुबोध भावे) आहे का हे पाहणारे.

विलास मुंबईला पत्नी स्मितासोबत (गौरी महाजन) लहानशा भाड्याच्या खोलीत राहतो. त्याचं मोटारसायकलचं गॅरेज आहे. एक दिवस तात्या पडतात आणि त्यांना भेटायला विलास गावी येतो. तात्यांचा नकार असतानाही विलास त्यांना मुंबईत येण्यासाठी तयार करतो. तात्या मुंबईत येतात. एक दिवस त्यांच्या डोक्यावरून विमान उडतं. ते तुकाबाबांचं पुष्पक विमान असल्याची थाप विलास मारतो आणि मग तात्यांची पुष्पक विमानात जाण्याची धडपड सुरू होते.


आजोबांची आठवण

हा सिनेमा एका हळव्या नात्याची कथा सांगणारा आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहताना प्रत्येकाला आपल्या आजोबांची आठवण होणं साहाजिक आहे. प्रथमच स्वतंत्रपणे सिनेमाची कथा लिहिणाऱ्या सुबोध भाावेने हे नातं अतिशय अलवारपणे न सादर करता काहीशा रांगड्या शैलीत सादर केलं आहे. इतक्या की यातील नातू आपल्या आजोबांना मित्रासारखं थेट ‘अरे-तूरे’ करतो. जळगावी ठेक्यात पटकथा लिहिताना चेतन सैंदाणे आणि वैभव चिंचाळकर यांनी कोकणी तडका देण्याचा प्रयत्न केला आहे. संवादलेखनही मनात घर करणारं आहे.


हृदयाला भिडणारे संवाद

“आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा दोस्त” , “आयुष्य वाढतं तसा आत्मा स्वाभिमानी आणि शरीर परावलंबी होतं” यांसारखे बरेच अर्थपूर्ण आणि थेट हृदयाला भिडणारे संवाद या सिनेमात आहेत. जळगावच्या केळ्यांचा घड आणि कोकणच्या फणसाची जुगलबंदी छान आहे. गंदीपटक, ढोक्या, डिंग्य्रा, बिनखजूर यांसारख्या जळगावी बोलीभाषेतील शब्दांचा वापर अचूकपणे केला आहे. मध्यंतरापूर्वीचा भाग खूप छान झाला आहे. व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावांची ओळख करतानाच दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि संवादांच्या आधारे सुरेख विनोदनिर्मिती केली आहे. उत्तरार्ध मात्र लांबला आहे. तात्यांच्या फोबियाचा जास्तच बाऊ झाला आहे.



सुखावणारं संगीत

नरेंद्र पंडीत यांचं संगीत सुखावणारं आहे. ‘देह पांडुरंग...’, ‘आनंदाचे डोही...’, ‘मुंबई सुपरकडक...’, ‘तुक्याचं आवताण आलं तात्या निघाला...’ ही गाणी चांगली आहेत. ‘नको वेळ काढू...’ हे गाणंही श्रवणीय असलं तरी सिनेमाची लांबी वाढवणारं आणि कथेच्या गतीत व्यत्यय आणणारं वाटतं.


तगडा अभिनय

मोहन जोशींच्या अभिनयाला तोड नाही. त्यांनी साकारलेले तात्या अविस्मरणीय आहेत. नातवासोबतच नातसूनेचाही मोठ्या मायेने स्वीकार करणारे तात्या मोहन जोशी यांनी अफलातून साकारले आहेत. सुबोध भावे या सिनेमात एका वेगळ्या रूपात दिसतो. प्रथमच सिनेमात काम करणाऱ्या गौरी महाजनने मध्यमवर्गीय सूनेच्या भूमिकेत कोकणी रंग भरताना कुठेही उणिव राहणार नाही याची काळजी घेतली आहे. इतर सर्वच कलाकारांनी लहान-सहान भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत.

तुकाराम महाराजांच्या भूमिकेत राहुल देशपांडे खटकतो. राहुलने मात्र ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. तुकारामांचा साक्षात्कार होणारी फँटसी थोडी जास्तच रंगवली आहे. महेश अणे यांचं छायालेखन छान आहे.

पुष्पक विमानाचा हा प्रवास केवळ एकट्या तात्याचा नसून आजोबा-नातू, आजेसासरे-नातसून आणि भक्त-देव यांच्या नात्याचीही गोष्ट सांगणारा आहे. त्यामुळेच काही उणिवा राहिल्या असल्या तरी हा प्रवास आल्हाददायक वाटतो.

दर्जा: ***

.............................................

मराठी चित्रपट: पुष्पक विमान

निर्माते: मंजिरी सुबोध भावे, सुनील फडतरे, अरुण जोशी, मुकेश पाटील

दिग्दर्शन: वैभव चिंचाळकर

कथा: सुबोध भावे

कलाकार: मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन, सुयश झुंझुरके, राहुल देशपांडे



हेही वाचा-

स्वप्नील-मुक्ताच्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ला ७ डिसेंबरचा मुहूर्त

मराठी पडद्यावर झळकणार ‘बच्चन’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा