Advertisement

सद्गुणांची चुंबकीय शक्ती

संदीप मोदी यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात त्यांनी चांगल्या आणि वाईट विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तीन मुख्य व्यक्तिरेखांच्या आधारे रेखाटलेला हा प्रवास ‘चुंबक’ या शीर्षकाला साजेसा आहे.

सद्गुणांची चुंबकीय शक्ती
SHARES

माणसाचं मन हे एक अजब रसायन आहे. यात चांगली आणि वाईट अशा दोन्ही वृत्ती आहेत. माणूस कितीही चांगला असला, तरी एखाद्या अडचणीच्या क्षणी त्याच्या मनात वाईट विचार येतात. त्यांचा सामना तो कशा प्रकारे करतो त्यावर त्याचं व्यक्तिमत्त्व ठरतं. जर वाईट प्रवृत्तीच्या आहारी न जाता आपल्या सद्गुणांशी प्रामाणिक राहिला तरच तो खऱ्या मानवधर्माला जागतो. याच सद्गुणांची चुंबकीय शक्ती दिग्दर्शक संदीप मोदी यांनी या सिनेमात सादर केली आहे.


चांगल्या, वाईट विचारांची सांगड

संदीप मोदी यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात त्यांनी चांगल्या आणि वाईट विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तीन मुख्य व्यक्तिरेखांच्या आधारे रेखाटलेला हा प्रवास ‘चुंबक’ या शीर्षकाला साजेसा आहे. आपण फसलो गेल्यानंतर इतरांना फसवून आपली नुकसान भरपाई करण्याचा दुर्गुण मानवात आहे. बरेचजण या दुर्गुणाचा वापर करत इतरांना टोप्या घालतात. पण प्रामाणिकपणाचा चुंबक मनात असलेले काहीजण अशा विचारांपासून आपोआपच परावृत्त होतात.



'अशी' आहे कथा

या सिनेमाची कथा भालचंद्र उर्फ बाळूभोवती (साहिल जाधव) गुंफण्यात आली आहे. आपलं स्वत: चं रसवंती गृह असावं हे मुंबईतील हॅाटेलमध्ये काम करणाऱ्या बाळूचं स्वप्न. गावात नवीन एसटी स्टँड सुरू झाल्याने तिथे जागा असल्याचा मामाचा फोन येतो, पण बाळूकडे निम्मेच पैसे असतात. धनंजय उर्फ डिस्को (संग्राम देसाई) हा बाळूचा जीवाभावाचा मित्र. त्याच्या ओळखीच्या एका मित्राच्या सांगण्यावरून बाळू पैसे दुप्पट करणाऱ्या स्कीममध्ये गुंतवतो.

मात्र या कंपनीने गाशा गुंडाळल्यावर नुकसान भरून काढण्यासाठी डिस्को आणि बाळू एक युक्ती करतात. आरबीआयची लॅाटरी लागल्याचे मेसेज ते इतरांना पाठवतात. आपल्याला लागलेल्या लॅाटरीचे पैसे घेण्यासाठी प्रसन्ना ठोंबरे (स्वानंद किरकिरे) नावाची व्यक्ती लोटेवाडी या गावातून मुंबईत येते. काहीसा मंद, भोळसट अशा प्रसन्नाकडून पैसे घेऊन बाळू आणि डिस्को त्याला फसवतात. त्यानंतर बाळूच्या मनातील चांगली वृत्ती त्याला कशी या सर्वांपासून परावृत्त करते त्याची कथा या सिनेमात आहे.



मैत्रीचा एक वेगळाच पैलू

साधी, सोपी, सरळ अशी कथा दिग्दर्शकाने तितक्याच साध्या पद्धतीने मांडल्याने सिनेमा पाहताना कुठेही अतिरंजीतपणा किंवा आततायीपणा जाणवत नाही. बाळू आणि प्रसन्ना यांच्यातील अविश्वसनीय चुंबकीय शक्ती सिनेमात आहे. चांगुलपणा आणि भाबडेपणा कसा एकमेकांना खेचून जवळ आणतो तेही आहे. यातच बऱ्याच गंमतीजमतीही घडतात. डिस्कोची चतुराई आणि बाळूचा प्रामाणिकपणा पाहण्याजोगा आहे. विशेष म्हणजे आपल्या चतुराईमुळे कमावलेलं सर्व गेलं तरी बाळूच्या मागे ठामपणे उभी राहण्याची डिस्कोची मैत्रीही दाद देण्याजोगी आहे. मैत्रीचा एक वेगळाच पैलू या सिनेमात पाहायला मिळतो.


पटकथा, संवादाचा मेळ

पटकथेची मांडणी आणि संवादलेखन यांचा अचूक मेळ साधल्याने पुढील प्रवास खूप सोपा झाला आहे. त्याला रिअल लोकेशनचीही अचूक साथ लाभली आहे. प्रसन्नाला लुबाडल्यानंतरही बाळूचं रेल्वेतून परत येऊन त्याला सांभाळणं हा या सिनेमाचा सर्वात मोठा टर्निंग पॅाइंट आहे. इथूनच कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आपण लुबाडलेल्या एका अनोळखी व्यक्तीप्रती दाखवलेली सहानुभूती आणि त्या व्यक्तीनेही अगदी भाबडेपणाने केवळ आपले पैसे आणि चेन मिळवण्यासाठी धरलेला हट्ट अगदी अनपेक्षितपणे पडद्यावर पाहायला मिळतं.

सिनेमा सुरू झाल्यापासून वेगात पुढे सरकतो. मध्यंतरापूर्वी काही ठिकाणी रेंगाळल्यासारखा वाटतो. साधारणपणे तीन दिवसांमध्ये घाडणाऱ्या या कथानकामध्ये अचानकपणे घडणारे शाब्दिक तसंच प्रासंगिक विनोद खुमासदारपणा आणण्यास पूरक ठरतात. गाणीही ठीक आहेत.



मनात घर करणारा प्रसन्ना

या सिनेमातील तीनही मुख्य व्यक्तिरेखांनी कमालीचा अभिनय केला आहे. स्वानंद किरकिरे यांना गीत आणि कथालेखनासोबतच लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारण्याचाही अनुभव आहे, पण या सिनेमात त्यांनी साकारलेला गतिमंद, भोळा, हट्टी असा प्रसन्ना मजेदार आहे. लकबी, बोलणं, वागणं, हालचाली यावर भर देत किरकिरे यांनी साकारलेला प्रसन्ना मनात घर करतो.

साहिल जाधव आणि संग्राम देसाई या दोन नवोदित कलाकारांचंही कौतुक करावंच लागेल. दोघांनीही खूप छान काम केलं आहे. संग्रामची भूमिका साहिलच्या तुलनेत छोटी आहे, पण त्याने मुंबई स्टाइलने साकारलेला डिस्को चांगला झाला आहे. साहिलच्या व्यक्तिरेखेत दोन पैलू आहेत. दोन्ही पैलू त्याने लीलया साकारले आहेत.

व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमाचा सुवर्णमध्य साधत बनवलेला हा सिनेमा सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा संवेदनशील सिनेमा मनोरंजनासोबतच काही इमोशनल क्षणही देतो.

दर्जा: ***1/2

.....................................

सिनेमा- चुंबक

प्रस्तुतकर्ता- अक्षय कुमार

निर्माते- अरुण भाटीया, नरेन कुमार

दिग्दर्शक- संदीप मोदी

लेखन- सौरभ भावे आणि संदीप मोदी

कलाकार- स्वानंद किरकिरे, साहिल जाधव, संग्राम देसाई


हेही वाचा-

‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा

वास्तववादी सिनेमासाठी अभिनेत्री बनली निर्माती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा