Advertisement

‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा


‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा
SHARES

‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यापासून मराठी सिनेसृष्टीत मैत्रीवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. मैत्रीचे नवे पैलू उलगडणाऱ्या ‘दोस्तीगिरी’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला.


अनावरण सोहळ्याला यांची उपस्थिती

महाविद्यालयातील नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्यावर आधारीत असलेल्या 'दोस्तीगिरी' या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा निवेदिता सराफ आणि अशोक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याशिवाय संकेत पाठक, पूजा मळेकर, विजय गीते, पूजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे या कलाकारांसह संगीतकार रोहन-रोहन, प्राजक्ता शुक्रे, मीनल जैन आणि कविता राम ही म्युझिकल टीमही उपस्थित होती.


निवेदिता सराफ यांची दोस्तीगिरी

संगीत प्रकाशनानंतर बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, जशी ‘दोस्तीगिरी’ सिनेमात घट्ट मैत्री दाखवली गेली आहे, तशीच अशोक शिंदेंसोबत माझी ३० वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे माझ्या जुन्या मित्रासोबत ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करणं माझ्यासाठी खूप खास आहे. संकेत पाठकची मी ऑनस्क्रिन आई झाले होते. तेव्हापासूनच माझी संकेतशीही ‘दोस्तीगिरी’ सुरू झाली आहे.


'हा अविस्मरणीय क्षण'

सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या संकेत पाठकनेही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, माझ्या पहिल्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा आणि त्यात माझे ऑनस्क्रिन आई-वडिल आशिर्वाद द्यायला आले, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचं चित्रीकरणही माझ्या कायम स्मरणात राहणारं आहे. कारण या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी मला अक्षय वाघमारे, विजय गीते, पूजा जयस्वाल, पूजा मळेकर असे जीवाभावाचे फ्रेंड्स मिळाले.


सिनेमाचं प्रदर्शन कधी?

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचं लेखन मनोज वाडकर यांनी केलं आहे. अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित ‘दोस्तीगिरी’ हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा