Advertisement

मिलिंद म्हणतोय ‘रे राया’


मिलिंद म्हणतोय ‘रे राया’
SHARES

मिलिंद शिंदेने अभिनेता म्हणून आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या मिलिंदने दिग्दर्शित केलेला ‘रे राया’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या ‘नॅाट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमापासून ‘शासन’ सिनेमापर्यंत मिलिंद शिंदेने कधी खलनायकाच्या तर सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. हाच मिलिंद आता दिग्दर्शकाच्या रूपात भेटणार आहे. मिलिंदने दिग्दर्शित केलेल्या ‘रे राया’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.


हा तर पहिला सिनेमा...

‘रे राया’ हा मिलिंदच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला पहिला सिनेमा नसला तरी प्रदर्शित होणारा मात्र पहिला सिनेमा ठरणार आहे. यापूर्वी मिलिंदने ‘नाच तुझंच लगीन हाय’ असं शीर्षक असलेला सिनेमा बनवला आहे, परंतु काही कारणास्तव तो रिलीज होऊ शकलेला नाही. त्यानंतर मिलिंदने ‘रे राया’चं दिग्दर्शन करत नव्या जोमाने आपल्या नव्या इनिंग्जला सुरुवात केली.


धावपटूंवर आधारीत कथानक...

‘रे राया’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा धावपटूंची कथा सांगणारा असल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येतं. पिळदार शरीरयष्टी असलेला एक पाठमोरा हात, त्या हातात असलेलं स्टॅाप वॅाच आणि समोरून धावत येणारी तीन मुलं... या पोस्टरवर दिसतात. यावरून एक कोच कोणत्या तरी महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपल्या विद्यार्थ्यांकडून सराव करवून घेत असल्याचं जाणवतं.


नशीबला देणार मात...

या सिनेमाच्या शीर्षकासोबत ‘कर धावा’ असं लहान शब्दांत लिहिण्यात आलं आहे. यावरूनही या सिनेमाचं आणि धावणं यांचं नातं असल्याचं सहजपणे लक्षात येतं. याखेरीज ‘मात द्यावी नशिबाला, मग थोडा भाव खावा...’ अशी टॅगलाईनही शीर्षकासोबत जोडण्यात आली आहे. त्यावरून नशिबाला मात देण्यासाठी धावणाऱ्या धावपटूंची कहाणी यात पाहायला मिळेल असंही लक्षात येतं.


दिग्दर्शनासोबतच गीतलेखनही...

दिग्दर्शनाच्या जोडीला मिलिंदने या सिनेमासाठी गीतलेखनही केलं आहे. लवकरच या सिनेमातील गीत-संगीताचंही प्रकाशन करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा