Advertisement

Movie Review : स्माईल करण्याचा मंत्र सांगणारी कथा

सुरळीत सुरू असलेली जीवनाची गाडी काही कारणानं थांबली, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी एखाद्याच्या मदतीनं स्वत:च प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर चेहऱ्यावर जे हसू फुलतं त्यासाठी 'स्माईल प्लीज' असं म्हणण्याचीही गरज भासत नाही.

Movie Review : स्माईल करण्याचा मंत्र सांगणारी कथा
SHARES

काही चित्रपट केवळ नातेसंबंध आणि भावभावनांवर आधारित असतात, तर काही एखाद्याच्या वाट्याला आलेले भोग आणि त्यात गुंतलेले नातेसंबंध दाखवणारे असतात. या चित्रपटाची कथा दुसऱ्या पद्धतीची आहे. नातेसंबंध फारसे चांगले नसताना, त्यात निसर्गानं दिलेले भोग भोगणाऱ्या एका यशस्वी स्त्रीची कथा या चित्रपटात आहे. 'हृदयांतर' या चित्रपटामध्ये मानवी नातेसंबंधांवर भाष्य केल्यानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी 'स्माईल प्लीज'मध्ये हेच नातं काहीशा वेगळ्या पद्धतीनं हाताळत त्याला नैसर्गिक संकटाची जोड दिली आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागत आहे. त्यात शारीरिक संकट ओढवलं की सारं काही स्थिरावून जातं. एखादा अवखळपणे वाहणारा प्रवाह अडथळा आल्यावर थांबतो, मग तिथलं पाणी निखळ न राहता थोडं प्रदूषित होतं. तसंच काहीसं मानवाचंही आहे. सुरळीत सुरू असलेली जीवनाची गाडी काही कारणानं थांबली, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी एखाद्याच्या मदतीनं स्वत:च प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर चेहऱ्यावर जे हसू फुलतं त्यासाठी 'स्माईल प्लीज' असं म्हणण्याचीही गरज भासत नाही. या चित्रपटाची कथाही असंच काहीसं सांगणारी आहे.

या चित्रपटाची कथा आहे फोटोग्राफर नंदिनीची (मुक्ता बर्वे). करिअरिस्टीक वुमन असलेल्या नंदिनीचं फोटोग्राफी क्षेत्रात खूप नाव असतं. मात्र लग्न झालेलं असूनही ती आपल्या वडीलांकडं म्हणजे अप्पांकडेच (सतिश आळेकर)रहात असते. चित्रपट दिग्दर्शक असलेल्या पती शिशिरपासून (प्रसाद ओक)ती जरी वेगळी झालेली असली तरी दोघांमधील नातं पार तुटलेलं नाही. त्यामुळंच शूटवर जाताना शिशिर त्यांची मुलगी नुपूरला (वेदश्री महाजन)अगदी हक्कानं अप्पांकडेच सोडत असतो. नुपूरच्या मनात मात्र आईबद्दल खूप राग असतो. त्यामुळंच नुपूर नंदिनीला आई न म्हणता 'ती' म्हणत असते. नंदिनी मात्र नुपूरला जे हवं ते देऊन मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. हळूहळू नंदिनीला विसराळूपणाची सवय लागते. लहान-सहान गोष्टी ती विसरू लागते. त्यामुळं शिशिर, नुपूर आणि नंदिनी यांचं नातं अधिकच तुटक बनतं. या सर्वांमुळं नंदिनी आपलं जगणंच हरवून बसते. अशातच अप्पांच्या घरी विराज (ललित प्रभाकर) पेईंग गेस्ट म्हणून रहायला येतो. त्यानंतर तो कशाप्रकारे नंदितीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो ते चित्रपटात पहायला मिळतं.

चित्रपटाची वनलाईन सकारात्मक दृष्टिकोनातून एक चांगला विचार मांडणारी आहे. कितीही संकटं आली तरी स्माईल हेच त्यावरील रामबाण इलाज असल्याचं सांगणारी आहे. निसर्गापुढं मानवाचं काहीच चालत नाही, पण त्यामुळं जगणं थांबवता कामा नये असा संदेश देणारी आहे. हे सगळं असलं तरी ज्या प्रकारे ती पडद्यावर सादर करण्यात आली आहे ती फारशी प्रभावी वाटत नाही. पडद्यावर घडणाऱ्या घटना खूप संथ गतीनं घडतात. त्यामुळं धीम्या गतीनं पुढं सरकणारं कथानक पहावं लागतं. नंदिनीला जो त्रास या चित्रपटात होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे त्यावर कशाप्रकारे उपाययोजना करण्याची गरज आहे हे सांगणारं डॅाक्टर अंजलीची व्यक्तिरेखा मार्गदर्शक आहे. 

एखाद्या गोष्टीची कालमर्यादा ठरलेली असते. डॅाक्टरही एखाद्या रोगाचा प्रोग्रेस कसा होऊ शकतो याचा अंदाज देतात, पण या चित्रपटात नंदिनीला होणाऱ्या त्रासाला काही लिमिटच नाही. कधी तो वेगानं जाणवतो, तर कधी पार गायबच होतो. त्यातील टप्पे सादर करताना गफलत झाली आहे. पटकथा सादरीकरणाची मांडणी आणखी जलद गतीनं होणं गरजेचं होतं. ती न झाल्यानं सिनेमात जो मुद्दा मांडायचा आहे त्याचा प्रभाव कमी होतो. परीणामी, पडद्यावर जे घडत असतं ते रटाळवाणं वाटू लागतं. चित्रपटाच्या अखेरीस नंदिनीच्या फोटोंचं एक प्रदर्शन भरवलं जातं, पण त्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार विजेत्याप्रमाणं हाईप देण्यात आली आहे. मीडिया, फोटोग्राफर्स, गर्दी, भाषण हे थोडं जास्तच वाटतं. गाणी कथानकाला साजेसी, प्रसंगानुरूप आणि अर्थपूर्ण आहेत. इतर तांत्रिक बाबीही चांगल्या आहेत, पण चित्रपट पाहून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जी स्माईल असायला हवी होती ती फुलवण्यात विक्रम काहीसा कमी पडला आहे.

मुक्ता बर्वेचा अभिनय अप्रतिम आहे. तिनं साकारलेली फोटोग्राफर उत्तम झाली आहे. या व्यक्तिरेखेसाठी तिनं फोटोग्राफी करण्याची शैली आत्मसात केल्याचं जाणवतं. चित्रपटाच्या अखेरीस दिलेल्या स्पीचमध्येही एक वेगळीच मुक्ता दिसते. ललित प्रभाकरनं छोटीशी भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. चेहऱ्यावर स्माईल आणणारी ही भूमिका त्याच्या चाहत्यांनाही नक्कीच आवडेल अशी आहे. प्रसाद ओकनं काहीसा तिरसट असा नवरा चांगल्या प्रकारे साकारला आहे. सतिश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन, आदिती गोवीत्रीकर यांचंही काम छान झालं आहे.

थोडक्यात काय तर फार अपेक्षा बाळगून हा चित्रपट पहायला जाता कामा नये. कलाकारांचा अभिनय आणि कोणत्याही संकटासमोर नांगी न टाकता त्याला कशाप्रकारे सामोरं जाण्याची गरज असतं ते जाणून घेण्यासाठी पहायला हरकत नाही.

दर्जा : **१/२

............................

मराठी चित्रपट : स्माईल प्लीज

निर्माते : निशा शाह, सानिका गांधी

पटकथा : विक्रम फडणीस, इरावती कर्णिक

दिग्दर्शक : विक्रम फडणीस

कलाकार : मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, आदिती गोवित्रीकर. वेदश्री महाजन
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा