Advertisement

Movie Review : पुलंची 'भाई'गिरी अन् शब्द-सूरांची मैफल

उत्तरार्धात जे पुलं दिसतात ते काहीसे पूर्वार्धासारखेच वाटतात. मात्र त्यात काही नावीन्यपूर्ण घटनांचा आणि शब्द-सूरांच्या मैफलीचा मात्र सुरेख समावेश करण्यात आला आहे.

Movie Review : पुलंची 'भाई'गिरी अन् शब्द-सूरांची मैफल
SHARES

'भाई - व्यक्ती की वल्ली' च्या पूर्वार्धात बालपणापासून विवाहबद्ध होऊन स्थिरस्थावर झालेले पु. ल. देशपांडे पाहिल्यावर उत्तरार्धात साहित्यिक पुलं पाहायला मिळतील अशीच अपेक्षा होती. पण उत्तरार्धात जे पुलं दिसतात ते काहीसे पूर्वार्धासारखेच वाटतात. मात्र त्यात काही नावीन्यपूर्ण घटनांचा आणि शब्द-सूरांच्या मैफलीचा मात्र सुरेख समावेश करण्यात आला आहे.


पुलंमधील आनंदी साहित्यिक

'मला आता जे मनापासून आवडेल तेच मी करणार आहे', असं म्हणत मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करणारे पुलं उत्तरार्धात आहेत. '२१ तास ते लोक आरसाच बघत असतात हो, तीन तास स्वप्नं बघूद्या की' हे वाक्य पुलंमधील आनंदी साहित्यिकाचं दर्शन घडवणारं आहे. एकीकडे कलेशी तडजोड न करणारे, तर दुसरीकडे बाबा आमटेंवर अन्याय करणाऱ्यांच्या छातील गोळ्या झाडण्याची भाषा करणारे पुलंही यात आहेत.


अस्ताला जाणारा पुलंरूपी सूर्य

उत्तरार्धातील भाई त्यांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांच्या माध्यमातून काहीसे तुकड्यातुकड्यांमध्ये पडद्यावर पाहायला मिळतात. दूरदर्शनवर नोकरी करताना त्यांची पंडीत जवाहरलाल नेहरूंशी झालेली भेट, सखाराम गटणेची तोंडओळख, बाबा आमटेंच्या आश्रमातील त्यांचा मुक्काम, जनता पक्षासाठी दिलेलं योगदान, त्यानंतर राज्यमंत्रीपदाची आलेली आॅफर, ती नाकारण्याचं पुलंचं धाडस, कुमार गंधर्वांसोबत रंगलेली मैफील, नाटकांचे प्रयोग, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तो पुरस्कार स्वीकारल्यावरही शिवसेनेविरोधात सडेतोड बोलणं, मग बाळासाहेबांनी सामनातून केलेला पलटवार, त्यानंतर आजारी पडल्यावर हळूहळू अस्ताला जाणारा मराठी साहित्यविश्वातील पुलंरूपी सूर्य या सिनेमात पाहायला मिळतो. यासोबतच आचार्य अत्रे, सतिश दुभाषी, माणिक वर्मा, भक्ती बर्वे, विजया मेहता, विजय तेंडुलकर या व्यक्तिरेखाही या सिनेमात पाहायला मिळतात.


चित्रीकरण खूप झाल्यानं सिनेमाचे दोन भाग

पुलंच्या जीवनावर आधरित असलेला पूर्वार्ध पाहिल्यानंतर उत्तरार्ध साहित्यीक जीवनाने भरलेला असावा अशी अपेक्षा होती, पण ती सर्वार्थाने पूर्ण होत नाही. पूर्वार्धाप्रमाणे उत्तरार्ध परीपूर्ण वाटत नाही. त्यामुळे चित्रीकरण खूप झाल्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दोन भाग केलेत की काय असं वाटत रहातं. असो, पण काही अंशी साहित्यीक पुलं यात अवतरले आहेत हेही नाकारता येणार नाही. 'बटाट्याची चाळ'साठी त्यांनी घेतलेली मेहनत, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नंतर त्यातही मन रमेना म्हणून त्यांनी स्वत:च गुंडाळून ठेवलेले प्रयोग, असे काहीसे कलेत आनंद शोधणारे पुलं यात आहेत. आनंदवन, मुक्तांगण, पुल देशपांडे ट्रस्ट यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यावरही या सिनेमात प्रकाश टाकण्यात आला आहे.



पूर्वार्धातील जादू उत्तरार्धात फिकी

'ती फुलणारी', सुंदर मी होणार, तुज आहे तुजपाशी या नाटकांचा धावता आढावा घेण्यात आला आहे, पण त्यांच्या सिनेमांचा उल्लेख नाही. या सिनेमाची सुरुवात मन प्रसन्न करणाऱ्या एका गाण्यानं होते. त्यानंतर येणारी 'अजूनी रुसून आहे...' ही कवी अनिलांची कविता छान जमली आहे. यासोबतच 'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी...' आणि कुमार गंधर्वांसोबत जमलेली माणिक वर्मा, भीमसेन जोशी, चंपूताई बडोदेकर, वसंत देशपांडे आणि पुलंची मैफील पुन्हा एकदा स्वर्गसुखाचा आनंद देऊन जाते. पूर्वार्धात खऱ्या अर्थाने महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाची जादू पाहायला मिळते. त्या तुलनेत उत्तरार्धात हीच जादू काहीशी फिकी पडते. इतर तांत्रिक बाबी चांगल्या आहेत. कलाकारांच्या कास्टिंगबाबत मांजरेकरांचं आणि मेकअप डिझाइनसाठी विक्रम गायकवाड यांचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल.


कलाकारांचे उत्तम अभिनय

सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांनी पूर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धातही अप्रतिम काम केलं आहे. उत्तरार्धात दोन्ही व्यक्तिरेखांचं वय थोडं वाढलेलं असल्याने त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागल्याचं सिनेमा पाहताना जाणवतं. वयोवृद्ध पुलं आणि सुनीताबाईंच्या भूमिकांमध्ये विजय केंकरे आणि शुभांगी दामले यांनीही छान अभिनय केला आहे. या सर्वांमध्ये सारंग साठेने साकारलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लक्ष वेधून घेतात. सारंगने बाळासाहेबांची हुबेहूब कॅापी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गिरीश कुलकर्णीने साकारलेली व्यक्तिरेखाही झकास आहे. त्या जोडीला अजय पूरकर, पद्मनाभ बिंड, सुनील बर्वे, राजन भिसे, वीणा जामकर, स्वानंद किरकिरे, दलिप ताहिल यांनीही आपलं काम चोख बजावलं आहे.


पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध काहीसा प्रभावहिन झाला असला तरी सर्व कलाकारांनी उत्तम अभिनयाद्वारे मांजरेकरांच्या नजरेतून साकारलेले पुलं पाहण्याची संधी दवडता कामा नये.

दर्जा : ***१/२
.................................

निर्माता : महेश मांजरेकर, अविनाश आठले, वैभव पंडीत, महेश पटेल, विरेंद्र उपाध्याय

दिग्दर्शक : महेश मांजरेकर

पटकथा : गणेश मतकरी

कलाकार : सागर देशमुख, इरावती हर्ष, विजय केंकरे, शुभांगी दामले, गिरीश कुलकर्णी, सारंग साठे, अजय पूरकर, पद्मनाभ बिंड, सुनील बर्वे, राजन भिसे, वीणा जामकर, अभिजीत चव्हाण, दलिप ताहिल, शैलेश दातार, स्वानंद किरकिरे, मेधा मांजरेकर, संजय खापरे, मधुरा वेलणकर, नीना कुलकर्णी, दिप्ती लेले, विकास पाटील



हेही वाचा - 

मादाम तुसॉमध्ये प्रियांकाचा चौकार

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा