Advertisement

Movie Review - मराठमोळ्या 'ठाकरी' विचारांचं मार्मिक चित्रण

बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी कसा लढा उभारला आणि त्यात ते कशाप्रकारे यशस्वी झाले त्याचं चित्रण म्हणजे 'ठाकरे'.

Movie Review - मराठमोळ्या 'ठाकरी' विचारांचं मार्मिक चित्रण
SHARES

मराठी माणसासाठी पोटतिडकीने लढणाऱ्या, राजकीय पक्षाची स्थापना करूनही कोणत्याही पदाची लालसा न बाळगणाऱ्या, वाघाच्या काळजाच्या व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांची कथा या सिनेमात आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी कसा लढा उभारला आणि त्यात ते कशाप्रकारे यशस्वी झाले त्याचं चित्रण म्हणजे 'ठाकरे'.


कुतूहल वाढवणारा सिनेमा

नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा मातब्बर अभिनेता बाळासाहेबांच्या भूमिकेत असल्याने या सिनेमाची उत्सुकता होतीच, पण सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याचं अधिक कुतूहल होतं. 'रेगे'सारखा दर्जेदार सिनेमा बनवणाऱ्या अभिजीत पानसेच्या दिग्दर्शनाखाली बनलेला असल्याने 'ठाकरे'कडून अपेक्षाही वाढल्या होत्या. अथपासून इतिपर्यंत प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करत या सिनेमाच्या माध्यमातून मराठमोळ्या 'ठाकरी' विचारांचं मार्मिक दर्शन अभिजीतने घडवलं आहे.


असं उलगडत बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व

सिनेमाची सुरुवात बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (नवाजुद्दीन सिद्दीकी) यांना लखनौच्या न्यायालयात हजर व्हावं लागतं तेव्हापासून होते. तिथे आपली बाजू मांडत असताना टप्प्याटप्प्याने बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणी फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जातं. फ्रि प्रेस जनरलमधील कार्टुनिस्ट म्हणून त्यांच्या नोकरीपासून हा प्रवास सुरू होतो. नोकरीचा राजीनामा, मराठी माणसाला मिळणाऱ्या तुच्छ वागणूकीविरोधातील चीड, मार्मिकची सुरुवात, लोकप्रियता, मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना, मोरारजी देसाईंचा मुंबई दौरा, बाळासाहेबांवरील हल्ला, कृष्णा देसाईंवरील प्रतिहल्ला, आणीबाणी, जॅार्ज फर्नांडीस-बाळासाहेबांमधील येरवडा तुरुंगातील संवाद, शिवसेनेवरील बंदी, बाळासाहेब-इंदिरा गांधींची भेट, ९२ची दंगल, ९३चे बॅाम्बस्फोट, पाकिस्तानसोबत क्रिकेट संघाला विरोध या आणि अशा बऱ्याच घटनाक्रमांतून, तसंच भाषण व संवादांमधून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे बाळासाहेब दाखवण्यात आले आहेत. यात बाळासाहेब-शरद पवार यांच्या मैत्रीचा धागाही आहेच.


बॅलंस साधण्यात यश

सिनेमाच्या पटकथेची मांडणी उत्कंठावर्धक असल्यानं सुरुवातीपासूनच उत्सुकता वाढते. सिनेमाच्या ओपनिंगला बाळासाहेब न्यायालयात हजर राहण्याच्या सीनपासून मोरारजी देसाईंना भेटण्यासाठी आंदोलन करणं, अमर हिंद मंडळातील भाषण, एअर इंडियामधील दमदाटी, येरवडा तुरुंगातील दिवस या सर्व घटना या सिनेमात मांडण्यात आल्या आहेत. यासोबतच शिवसैनिकांनी केलेल्या काही वादग्रस्त कृतींचं चित्रणही धाडसानं केलं आहे. त्यामुळे सिनेमा बॅलंस वाटतो.

मराठी माणसाच्या हक्कासाठी झटणारे, देशप्रेमी, हिंदुत्वाचा ज्वलंत हुंकार, क्रिकेट प्रेमी, व्यंगचित्रकार, कलाप्रेमी बाळासाहेब दाखवताना पानसे यांनी त्यांच्यातील मुलगा, पती, भाऊ आणि पित्याची झलकही दाखवली आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या खासगी आणि वैचारिक जीवनाकडे पाहण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हणाावंसं वाटतं. बाळासाहेबांचे विचार जसे शिवसैनिकांना प्रेरणा देणारे आहेत, तसेच या सिनेमातील 'हा बाळ महाराष्ट्राला अर्पण करत आहे', हे प्रबोधनकरांच्या मुखातील वाक्यही मनाला भिडणारं आहे.


तांत्रिक बाजूही जमेची

पहिल्या दृश्यापासून सिनेमा अपेक्षित वेगात पुढे सरकल्याने कुतूहल अधिक वाढतं. मध्यंतरापूर्वीचा बराचसा भाग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, तर मध्यंतरानंतर जसजशी शिवसेनेची मूळं खोलवर पोहोचू लागतात तसा सिनेमात प्रथम भगवा आणि नंतर सर्वच रंग येतात. मध्यंतरानंतर भाषणबाजी आणि विचारसरणी यावर अधिक फोकस करण्यात आल्यानं थोडी गती मंदावल्यासारखी वाटते, पण त्यामुळे फार काही फरक पडत नाही. वातावरण निर्मिती, पार्श्वसंगीत, कला दिग्दर्शन आणि कॅमेरावर्क यावर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. संकलनही चांगलं आहे. 'ठाकरे' सिनेमाचा हा प्रवास इथेच थांबलेला नसून, पुढील भागतही तो सुरू राहणार असल्याची चाहूल सिनेमाच्या शेवटी लागते.


अभिनयातील वाघ

आपण अभिनयातील वाघ आहोत हे पुन्हा एकदा नवाजुद्दीन सिद्दीकीने दाखवून दिलं आहे. त्याने कोणताही बडेजाव न आणता बाळासाहेबांची भूमिका साकारल्यानं ही भूमिका स्मरणात राहते. बाळासाहेबांची स्टाईल आणि लाईफस्टाइल नवाजुद्दीनने चांगलीच आत्मसात केली आहे. मीनाताईंच्या भूमिका साकारणाऱ्या अमृता रावच्या वाट्याला लहान-सहान सीन्स आले आहेत, पण बाळासाहेबांनी पाठवलेल्या पत्राच्या दृश्यात तिने अफलातून अभिनय केला आहे. प्रवीण तरडेने साकारलेले दत्ताजी साळवीही लक्षात राहतात. इतर सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत.


मराठी माणसाच्या हितासाठी लढा पुकारणाऱ्या एका वाघाची कथा पाहताना बाळासाहेब हे माणूस म्हणून कसे होते हे देखील हा सिनेमा पाहताना जाणवतं. बायोपीकच्या माध्यमातून बाळासाहेबांना रुपेरी पडद्यावर सादर करणारा हा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांचे विचार ऐकण्यासाठी पाहायला हवा.

दर्जा : ****
..................................................................................

निर्माते : वायकॅाम १८ मोशन पिक्चर्स, डॅा. श्रीकातं भसी, वर्षा राऊत, पूर्वशी राऊत, विधीता राऊत

पटकथा-दिग्दर्शन : अभिजीत पानसे

कलाकार : नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, प्रवीण तरडे, सुधीर मिश्रा, अब्दुल कादीर अमिन, लक्ष्मण सिंह राजपूत


हेही वाचा -

आणि 'ठाकरे'च्या शोमध्ये शिवसैनिकांनीच घातला गोंधळ!

...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा