Advertisement

Movie Review : व्हॅाट्सअपवर रंगलेल्या प्रेमाचा फसवा डाव

बिझनेस डीलपासून, मुलाखतींपर्यंत बरीच कामं व्हॅाट्सअपनं सोपी केली आहेत. ओघानं यात प्रेमही आलंच. व्हॅाट्सअपच्या माध्यमातून जुळलेली प्रेम प्रकरणं आपण ऐकत असतोच. असंच एक व्हॅट्सअप लव या चित्रपटात पहायला मिळतं.

Movie Review : व्हॅाट्सअपवर रंगलेल्या प्रेमाचा फसवा डाव
SHARES

आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. व्हॅाट्सअप, फेसबुक, ट्वीटर यांनी मानवी जीवन अगदी व्यापून टाकलं आहे. नव्हे नव्हे सोशल मीडिया हा तर आज काहींचा जीव की प्राण बनला आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून गृहिणींपर्यंत जिथं सर्वांनाच व्हॅाट्सअपनं पछाडलं आहे, तिथं तरुणाई कशी मागे राहील बरं. आज तरुणाईचं सारं काही चालतं ते व्हॅाट्सअपच्या माध्यमातून. बिझनेस डीलपासून, मुलाखतींपर्यंत बरीच कामं व्हॅाट्सअपनं सोपी केली आहेत. ओघानं यात प्रेमही आलंच. व्हॅाट्सअपच्या माध्यमातून जुळलेली प्रेम प्रकरणं आपण ऐकत असतोच. असंच एक व्हॅट्सअप लव या चित्रपटात पहायला मिळतं. 

भारतातील आघाडीच्या गायकांसोबत आजवर सांगितीक कार्यक्रमांमध्ये रमलेले हेमंतकुमार महाले या चित्रपटाच्या निमित्तानं चित्रपट दिग्दर्शनाकडं वळले आहेत. पहिलाच चित्रपट बनवताना त्यांनी शीर्षकापासून विषयापर्यंत काही गोष्टींमध्ये नावीन्याचा शोध घेतला असला तरी, चित्रपटाची मांडणी आणि सादरीकरण यात मात्र जराही नावीन्य आढळत नाही. त्यात अनेकदा संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या कलाकारांची मुख्य भूमिकासाठी केलेली निवड या चित्रपटाचा प्रभाव कमी करणारी वाटते. चित्रपट चकचकीत बनवण्यावर भर देण्याऐवजी सादरीकरणावर मेहनत घेण्याची गरज होती.

शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाचा हूक आहे व्हॅाट्सअप... व्हॅाट्सअप आणि प्रेम या दोन मुद्द्यांभोवती या चित्रपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. आदित्य (राकेश बापट) आणि अनू (अनुजा साठ्ये) या जोडप्याची ही गोष्ट आहे. यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. आज ज्याप्रमाणे अनेकांना अनोळखी नंबवरून मेसेजेस येतात, तसं वैवाहिक जीवन आनंदात सुरू असलेल्या आदित्यच्या फोनवरही एक दिवस अचानक एका अनोळखी तरुणीचा मेसेज येतो. ती आदित्यसोबत मैत्री करायला उत्सुक असते, पण सुरुवातीला मात्र आदित्य तिच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करतो. कित्येकदा मित्रच चक्रव्यूहात अडकवतात, तसं आदित्यच्या बाबतीत घडतं. मित्राच्या सल्ल्यावरून व्हॅाट्सअपच्या माध्यमातून आदित्य त्या तरुणीशी बोलू लागतो. त्या तरुणीचं नाव मोनालिसा असल्याचं आदित्यला समजतं. तिच्यासोबत चॅटिंग करताना आदित्य वहावत जातो. हळूहळू प्रेमात पडल्यानं तो मोनालिसाशी थेट फोनवर बोलू लागतो. त्यामुळं अनुसोबतच्या वैवाहिक जीवनात वितुष्ट निर्माण होतं. जवळजवळ वर्षभर फोनवर गप्पा मारल्यानंतर दोघेही भेटतात. त्यानंतर काय घडतं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

खरं तर या चित्रपटाच्या कथेत जराही नावीन्य नाही. चावून चोथा झालेली कथा केवळ व्हॅाट्सअपचा टॅग लावून पुढं करण्यात आली आहे. आजवर वर्षानुवर्षे पहात आलेली मांडणी निराशाजनक आहे. त्यामुळं जुन्या साचेबद्ध चित्रपटांच्या मांडणीची कॅापी असं या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. दिग्दर्शनासोबतच कथा लेखनही हेमंतकुमार यांनीच केलं आहे. त्यामुळं ढिसाळ लेखनासोबतच सादरीकरणाची जबाबदारीही त्यांच्यावरच येते. कथेमध्ये तर दम नाहीच, पण पटकथेत तरी उत्कंठावर्धक प्रसंगांची पेरणी नीट करण्याची आवश्यकताही भासली नाही याचं नवल वाटतं. संवाद केवळ तरुणाईला भावतील असे असून उपयोगाचे नाहीत, तर काहीतरी सांगणारेही असायला हवेत. 

पहिल्या दृश्यापासून सिनेमा संथ गतीनं पुढे सरकल्यानं रटाळ वाटू लागतो. जेमतेम पंधरा-वीस मिनिटं पाहिल्यावर कधी एकदाचं मध्यंतर होतं असं वाटतं. गाणी उगाच घुसडण्यात आल्यासारखी वाटतात. त्यामुळं ती कथानकाशी एकरूप होत नाहीत. गाणी चकचकीत वाटावीत यासाठी तांत्रिकदृष्ट्या बरीच मेहनत घेण्यात आल्याचं जाणवतं. या चित्रपटाची कथा व्हॅाट्सअप चॅटिंग आणि कोणतीही पार्श्वभूमी ठाऊक नसताना अनोळखी लोकांशी केली जाणारी मैत्री आणि नंतर त्याचं प्रेमात होणारं रूपांतर या एका चांगल्या वनलाईनवर आधारित आहे, पण कथा आणखी चांगल्या पद्धतीनं खुलवण्याची आवश्यकता होती. सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांनी गाण्यांमध्ये केलेली सिनेमॅटोग्राफी लक्ष वेधून घेणारी आहे. दिग्दर्शक या नात्यानं हेमंतकुमार यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

राकेश बापटनं आदित्यची भूमिका ठीकठाक साकारली आहे. त्यानं आपल्या मर्यादा ओळखून काम करण्याची गरज आहे. कधी कधी ओव्हर अॅक्टिंग करण्याच्या नादात व्यक्तिरेखेचं नुकसान होतं याचं भान राखायला हवं. अनुजा साठ्येनं त्याला सुरेख साथ दिली आहे. ही व्यक्तिरेखा आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि कथानकाला न्याय देणारी ठरावी यासाठी अनुजानं विशेष मेहनत घेतल्याचं जाणवतं. या दोघांच्या जोडीला पल्लवी शेट्टीनंही चांगलं काम केलं आहे. इतर कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे. 

सोशल मीडिया हे जसं माहितीचं जाळं आहे, तसंच ते हनीट्रॅपही असल्याचं ओळखण्याची गरज आहे. इथे अनोळखी व्यक्तींशी केलेली मैत्री कधी कधी फार जड जाऊ शकते असाच काहीसा संदेश देणारा हा चित्रपट फावला वेळ असेल तर पहायला हरकत नाही.

दर्जा : *१/२ 

..............................................

मराठी चित्रपट : व्हॅाट्सअप लव  

निर्माती, कथा, दिग्दर्शन : हेमंतकुमार महाले

पटकथा, संवाद : अजित काळे

कलाकार : अनुजा साठ्ये, राकेश बापट, पल्लवी शेट्टी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा