Advertisement

राक्षस...जंगलातल्या कोड्यांचं रहस्य!

अचानक अविनाश जंगलात गायब होतो. आणि राजकुमारीचा म्हणजेच अरूचा आपल्या बाबाला जंगलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी शोध सुरू होतो. पुढे अरू बाबाचा शोध कसा घेते? जंगलाची कोडी कशी सोडवते? तिला अविनाश सापडतो का? या सगळ्या रहस्यमयी प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट देतो.

राक्षस...जंगलातल्या कोड्यांचं रहस्य!
SHARES

जंगलात रहाणारा राक्षस आणि त्याला बुद्धीचातुर्याने हरवणारा राजकुमार किंवा राजकन्या. कथेचा हा प्लॉट आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या लहानपणी वाचला, ऐकला आणि पाहिला असेल. पण याच प्लॉटवर एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधणारा 'राक्षस' त्याच कथांसारखा रहस्यमयी आहे. त्याच कथांप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण करतो. आणि त्याच कथांसारखा शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवतो!

राक्षस ही एक जंगलात घडलेली अविनाश(शरद केळकर), इरावती (सई ताम्हणकर) आणि अरू (ऋतुजा देशपांडे) या तिघांची गोष्ट आहे. अविनाश हा आदिवासींच्या जीवनावर डॉक्युमेंट्री बनवत असतो. त्यासाठी तो अनेकवेळा जंगलात जातो. एकदा तो सोबत त्याची मुलगी अरूलाही घेऊन जातो. यावेळी जंगलात अरूला एक पुस्तक सापडतं. या पुस्तकात राजकुमारीने आपल्या राजाला राक्षसाच्या तावडीतून कसं सोडवलं ही गोष्ट असते. हळूहळू आदिवासी आणि जंगलात येणारी नवीन कंपनी या संघर्षात अविनाश पूर्ण अडकतो. अचानक अविनाश जंगलात गायब होतो. आणि राजकुमारीचा म्हणजेच अरूचा आपल्या बाबाला जंगलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी शोध सुरू होतो. पुढे अरू बाबाचा शोध कसा घेते? जंगलाची कोडी कशी सोडवते? तिला अविनाश सापडतो का? या सगळ्या रहस्यमयी प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट देतो.



चित्रपटात इरावती म्हणजेच सई ताम्हणकर आणि अरू म्हणजेच ऋतुजा देशपांडे या दोघींचाही अभिनय उत्तम झाला आहे. चित्रपटात शरद केळकरला अभिनयासाठी फारसा वाव नाहीये. मात्र या तिघांबरोबरच परसू हे पात्र फार महत्त्वाचं आहे. विठ्ठल काळे परसू ही भूमिका अक्षरश: जगला आहे. सई ताम्हणकर आणि ऋतुजा इतकाच परसू लक्षात राहतो.

हाफ तिकीटनंतर ज्ञानेश झोटींग यांचा राक्षस हा दुसरा चित्रपट. गेल्या तीन वर्षांपासून ते राक्षसच्या स्क्रिप्टवर काम करत होते. त्यामुळे त्यांचं काम या चित्रपटात न दिसतं तरच नवल! आदिवासींच्या संघर्षाचे प्रसंग अक्षरश: आंगावर येतात. शिवाय या सर्व प्रसंगाना मिळालेली साउंड इफेक्टची साथ ते प्रसंग जिवंत करते. चित्रपटाचं संगीतही उठावदार झालं आहे. त्यासोबतच जंगल बोलतं...जंगल नाचतं..जंगल रडतं.. यासारखी ऱ्हिदमिक वाक्य चित्रपट बघण्यास भाग पाडतात.

मात्र, प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करण्यात चित्रपट कमी पडतो. जंगल, राक्षस म्हटल्यावर सगळ्यात आधी भिती आपल्या समोर येते. मात्र, चित्रपट बघताना कुठेच भिती वाटत नाही. त्याचप्रमाणे जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्राणी येतात. मात्र संपूर्ण चित्रपटात एकही प्राणी दिसत नाही. त्यामुळे चित्रपट वास्तविकतेपासून दूर जात असलेला दिसतो. सात- आठ वर्षांची अरू रात्री अपरात्री एकटी जंगलात फिरताना दिसते. रात्री जंगलातील गुहेत जाणारी अरू एखाद्या मॉलमध्ये फिरल्यासारखी फिरते. अरू ज्या गुहेत जाते, ती गुहाही भितीदायक वाटत नाही. कोड्यांची उत्तरं अरूला सहजरीत्या मिळतात कशी? असे अनेक प्रश्न राक्षस बघताना पडतात.

पण हे सगळं जरी असलं, तरी ज्ञानेश झोटिंग यांचं उत्तम दिग्दर्शन आणि तेवढीच तगडी कथा या सगळ्या बाबींना झाकून टाकतात. शिवाय सई ताम्हणकर आणि ऋतुजा या दोघींनी प्रेक्षकांना खुर्चीवरच खिळवून ठेवण्याचं काम चोख बजावलं आहे. त्यामुळे तुम्ही जर रहस्यमयी चित्रपटांचे फॅन असाल आणि लहानपणीच्या त्या राक्षसाला हरवण्यासाठी तयार असाल, तर एकदा तरी राक्षस बघाच!


Movie - Rakshas

Actor - Sai Tamhankar, Sharad Kelkar, Rutija Deshpande

Ratings - 3.5/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा