आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’

सिनेमात मोठे कलाकार सराईतपणे वावरतातच, पण त्यासोबतच लहानसहान भूमिकांमध्येही मोठमोठे कलाकार दिसतात. त्यामुळे ट्रेलर पाहिल्यावर हृषिकेशने उभारलेल्या या ‘स्वीट होम’मध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळेल याबाबत अपेक्षा वाढतात. तसा प्रयत्नही त्याने केला आहे, पण कथानकामधील त्रुटींनी घोटाळा केला आहे.

  • आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’
  • आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’
  • आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’
SHARE

घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. मग ते १० बाय १० स्क्वेअर फुटांचं असो, वा हजार... घर हे घरच असतं. त्या केवळ चार भिंती नसतात, तर त्यात असतो आठवणींचा ओलावा. त्यामुळेच जुन्या घरातून नव्या घरात जाताना मनात आनंद असतो. पण डोळ्यांत आसवंही दाटून आलेली असतात. दिग्दर्शनाकडे वळताना अभिनेता हृषिकेश जोशीने सर्वसामान्यांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वांच्या आवडीचा विषय असलेल्या घरावर सिनेमा बनवला आहे.
सिनेमात मोठे कलाकार सराईतपणे वावरतातच, पण त्यासोबतच लहानसहान भूमिकांमध्येही मोठमोठे कलाकार दिसतात. त्यामुळे ट्रेलर पाहिल्यावर हृषिकेशने उभारलेल्या या ‘स्वीट होम’मध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळेल याबाबत अपेक्षा वाढतात. तसा प्रयत्नही त्याने केला आहे, पण कथानकामधील त्रुटींनी घोटाळा केला आहे. सिनेमाची गती मंदावल्याने एकाच जागी थबकलेलं कथानक आणि त्याभोवती जीवाचा आटापीटा करत अभिनय करणारे दर्जेदार कलावंत असा खेळ पहायला मिळतो.


विद्याधर महाजन (मोहन जोशी) आणि श्यामल महाजन (रीमा) हे वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या घराची कथा या सिनेमात आहे. वयाची साठी ओलांडलेल्या या जोडप्याचं घर एका जुन्या इमारतीत आहे. गुडघेदुखीचा त्रास असल्याने श्यामलला लिफ्ट नसलेल्या इमारतीतून टॅावरमध्ये जाण्याचे वेध लागलेले असतात. घरांची खरेदी-विक्री करणारा एजंट सोपान (हृषिकेश जोशी) हा महाजन यांच्यासाठी घरातील सदस्याप्रमाणेच असतो.

एकदा अचानक घडलेल्या प्रसंगातून श्यामलला सोपानकडून त्यांच्या राहत्या घराची किंमत समजते. त्यानंतर श्यामल टॅावरमध्ये राहायला जायची स्वप्नं पाहू लागते. पण विद्याधरला मात्र ते मान्य नसतं. अखेर एका भावनिक क्षणी विद्याधरही यासाठी तयार होतात. त्यानंतर सुरू होतो ‘इकडून तिकडे’ स्थलांतरीत होण्याचा खेळ.जुन्या चाळीतून फलॅटमध्ये राहायला जाताना भावनाशील होणाऱ्या नायक-नायिकांची कथा यापूर्वीही काही वेळा पडद्यावर आलेली आहे. इथे फ्लॅटऐवजी टॅावरचा उल्लेख आहे. सिनेमाची सुरुवात गंमतीशीर पद्धतीने होते. सुरुवातीला गतीही ठीकठाक आहे. मध्यंतरानंतर मात्र अचानक सिनेमा स्तब्ध होतो. एकाच जागी थबकतो. मध्यंतरापूर्वी विद्याधर आणि श्यामल यांच्यातील संवादांमधून काही मनोरंजन क्षण अनुभवण्याची संधी मिळते. याखेरीज सोपानची आई आणि त्याच्यातील दृश्येही गंमतीशीर वाटतात. प्रसाद ओकचं अचानक येणं आणि थेट घरात घुसण्याचा सीन छान जमला असून कथानकात महत्त्वाचा आहे.

सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टरची आखणी सुरेख झाली असली, तरी कथानक पुढे सरकत नसल्याने शेवटी काहीच उरत नाही. घर बदलायचं ठरवल्यावर समोरच्या व्यक्तीने नकार दिल्यानंतर दुसरं घर शोधण्याचा प्रयत्न न करता ‘ठेविले अनंते...’ असं म्हणत त्याच घरात आनंदाने राहण्याचा निर्णय घेतला जातो. विद्याधरच्या मानलेल्या बहिणीची मुलगी देविकाचा (स्पृहा जोशी) ट्रॅक दोन पिढ्यांमाधील मानसिकता दर्शवणारा आहे. काही ठिकाणी मात्र तो ताणल्यासारखा वाटतो.

वैभव जोशीने लिहिलेल्या आणि म्हटलेल्या या सिनेमातील कविता अर्थपूर्ण आहेत. हा एक नवा प्रयोग कौतुकास्पद आहे. त्या कवितांसोबत पुन: पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जाणारी दृश्य कंटाळा आणतात. कवितांच्या या प्रवासातील आणि संपूर्ण सिनेमातही रीजू दास यांचं कॅमेरावर्क सुरेख आहे. अजय गोगावलेच्या  आवाजातील ‘इकडून तिकडे...’ हे गाणं चांगलं झालं आहे.पुन्हा एकदा रीमा आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवल्याचं समाधान हा सिनेमा देतो. रीमा यांनी जाता जाता अप्रततिम अभिनय केला आहे. दुर्दैवाने त्या डबिंग पूर्ण करू शकल्या नाहीत. रीमा यांना पाहताना हेच खटकत राहतं. निर्मिती सावंत यांनी रीमा यांचं डबिंग अचूकपणे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला, तरी रीमा यांच्या आवाजासारखी धार निर्मिती यांच्या आवाजात नसल्याने थोडं मिसमॅच वाटतं. मोहन जोशी पुन्हा एकदा अप्रतीम. स्पृहा जोशीनेही चांगलं काम केलं आहे. हृषिकेश जोशीने आपल्या नेहमीच्या शैलीत सोपान साकारताना अचूक टायमिंगवर भर दिला आहे. विभावरी देशपांडेने मोलकरणीच्या छोट्याशा भूमिकेतही सुरेख काम केलं आहे.

कलाकारांच्या जबरदस्त परफॅार्मंसमुळे तरलेल्या या सिनेमाकडे दिग्दर्शक या नात्याने हृषिकेशनेही थोडं आणखी लक्ष देत कथानकात आवश्यक बदल करत गती वाढवण्याची गरज होती. जुन्या घरातील आठवणींच्या हिंदोळ्यावर नेणारा हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.
 चित्रपट - होम स्वीट होम

निर्मिती - फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि.

निर्माते - हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर

दिग्दर्शक - हृषीकेश जोशी

कथा – हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले

कलाकार – रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुखहेही वाचा -

'या' नेत्याचा मुलगा बनला अभिनेता!

महेश मांजरेकरांनी साधली दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया 

संबंधित विषय
ताज्या बातम्या