Advertisement

मालिका दिग्दर्शक बनला पायलट


मालिका दिग्दर्शक बनला पायलट
SHARES

छोट्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून काम करताना आपणही कधीतरी सिनेमा दिग्दर्शक बनावं असं वाटत असतं, पण दिग्दर्शन करता करता थेट विमानाचा पायलट बनण्याचं स्वप्न कोणीही पाहिलं नसेल. वैभव चिंचाळकर नावाच्या दिग्दर्शकाला ते स्वप्न पडलं आणि तो थेट ‘पुष्पक विमान’चा पायलटच बनला!

‘कॅप्टन आॅफ द शीप’ किंवा ‘पायलट आॅफ द प्लेन’ असं नेहमीच सिने-नाट्य दिग्दर्शकांसाठी म्हटलं जातं, पण मालिका दिग्दर्शनाकडून सिने दिग्दर्शनाकडे वळलेला वैभव चिंचाळकर मात्र खरोखरच विमानाचा पायलट बनला आहे. पदार्पणातच त्याने अशा सिनेमाचं दिग्दर्शन केलं ज्याचं शीर्षकच ‘पु्ष्पक विमान’ असं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वैभवने ‘मुंबई लाइव्ह’शी साधलेला संवाद...


मालिकांकडून सिनेमांकडे

मालिका विश्वात वैभवने खूप काम केलं आहे. दिलीप प्रभावळकरांची मुख्य भूमिका असलेल्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेपासून त्याने सहाय्यक दिग्दर्शनाच्या रूपात कारकिर्द सुरू केली. ‘कुलवधू’ ही स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून वैभवची पहिली मालिका. ‘बंध रेशमाचे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘पुढचं पाऊल’, ‘नकूशी’ या मालिकांचंही दिग्दर्शन वैभवने केलं आहे. ‘दुनियादारी’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शनही केलं आहे. ‘पुष्पक विमान’द्वारे वैभव स्वतंत्र सिने दिग्दर्शक बनला आहे.


सुबोधमुळे मिळाली संधी

अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावेला एक कथा सुचली आणि त्याने थेट फोन केल्याचं सांगत वैभव म्हणाला की, सुबोधच्या मनात एक विचार घोळत होता. त्यावर त्याला कथा सुचली. त्याने ती मला ऐकवली. या कथेवर मी आणि चेतन सैंदाणे यांनी पटकथा लिहिली. त्यावेळी सुबोध माझ्याकडेच दिग्दर्शनाचीही जबाबदारी सोपवेल याची जराही कल्पना नव्हती.


असा बनला दिग्दर्शक

सुबोधने जणू ‘पुष्पक विमान’साठी स्वत:ला वाहूनच घेतलं आहे. कोणताही प्रोजेक्ट तो याच तळमळीनं करतो. पण हा सिनेमा त्याच्या जवळच्या नात्याशी संबंधीत असल्याने तो या सिनेमात खूप इन्व्हॅाल्व्ह आहे. मुख्य भूमिकेतही तोच आहे. सुरुवातीला दिग्दर्शनही तोच करणार होता. निर्माताही तोच आहे. मी त्याचा खूप जवळचा मित्र असल्याने मग दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने माझ्याकडे सोपवली.


गोष्ट आहे नात्यांची

‘पुष्पक विमान’ ही कथा आहे नात्यांची. आजोबा आणि नातू यांच्यातील गोडव्याची. आजोबांवर मनापासून प्रेम करणारा नातू त्यांच्या म्हातारपणी त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारे धडपड करतो ते दाखवणारी गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हा-आम्हा सर्वांनाच आपल्या बालपणी घेऊन जाणारी असून नक्कीच आजी-आजोबांची आठवण करून देणारी आहे.


तात्या नजरेसमोरच होते

या सिनेमात तात्या म्हणजेच सुबोधच्या आजोबांची भूमिका साकारण्यासाठी मोहन जोशी हेच नाव डोळ्यांसमोर होतं. तात्या हे किर्तनकार आहेत. त्यामुळे अभिनयासोबतच गायनाचंही अंग असणारा परफॅार्मर कलावंत हवा होता. मोहन जोशी हे सर्वार्थाने परफॅार्मर आहेत. याशिवाय सुबोधने त्यांच्यासोबत बऱ्याच सिनेमांमध्ये कामही केलं आहे.


‘झी’मुळे सोपं झालं काम

‘झी टॅाकिज’सारखा डिस्ट्रीब्यूशन पार्टनर मिळाल्याने ‘पुष्पक विमान’चा प्रवास खूपच आरामदायी बनला आहे. एखादा सिनेमा कशा पद्धतीने घरोघरी पोहोचवायचा याचं तंत्र जाणणारी उत्तम टीम त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सिनेमा पोहोचवणं सोपं जातं.


लाईव्हचा अनुभव सुरेख

दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव छान होता. त्यातही लाईव्ह लोकेशन्सवर चित्रीकरण करण्याचा अनुभव सुरेख होता. थोडं प्रेशर होतं. पण त्यातही गंमत होती. गेट वे आॅफ इंडीया, एअरपोर्ट, वस्तीत, रस्त्यावर लोकल वाहतूक सुरू असताना काम करणं जिकीरीचं होतं.हेही वाचा -

...अखेर ‘आक्रंदन’ प्रदर्शनासाठी सज्ज

गायिका अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांचा ब्रिटिश संसदेत सत्कार
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा