Advertisement

लॉस एंजलिसमध्ये मराठमोळा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’

बिग बजेट सिनेमांची परंपरा पुढे चालवत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा मराठी सिनेमा पूर्णपणे लॉस एंजलिसमध्ये चित्रीत करण्याची योजना आखण्यात आली आहे.

लॉस एंजलिसमध्ये मराठमोळा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’
SHARES

आज मराठी सिनेमा केवळ फिल्म फेस्टिव्हल्स आणि पुरस्कार सोहळ्यांसाठी साता समुद्रापार जात नाही. हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांप्रमाणे मराठी सिनेमांचं चित्रीकरणही विदेशी भूमीवर होऊ लागलं आहे. अशाच बिग बजेट सिनेमांची परंपरा पुढे चालवत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा मराठी सिनेमा पूर्णपणे लॉस एंजलिसमध्ये चित्रीत करण्याची योजना आखण्यात आली आहे.


लॉस एंजलिसमध्ये चित्रण

मराठी सिनेमांची व्यावसायिक गणितं खूप वेगळी आहेत. त्यामुळंच मराठी सिनेमांवर पैसे खर्च करताना त्याच्या परताव्याचाही खूप बारकाईनं विचार केला जातो. पण आशयघन कथानक आणि दर्जेदार निर्मितीमूल्यं असतील तर सिनेमाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध होऊ शकतात हे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या सिनेमानं दाखवत स्वत:चं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी नव्हे, तर कथानकाची गरज म्हणून हा सिनेमा अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये चित्रीत केला जाणार असल्याचं सिनेमाच्या टिमकडून सांगण्यात येत आहे.


साईबाबा स्टुडिओज मराठीत

‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शिका अड. समृद्धी पोरे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चं दिग्दर्शन करणार आहेत. ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमानं या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. टेलीव्हिजन विश्वात बऱ्याच दर्जेदार कलात्मक कार्यक्रम देणारी ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मितीसंस्था या निमित्तानं मराठीत पहिलं पाऊल ठेवत आहे.


विषय गुलदस्त्यात

तीन चित्रपटांच्या यशानंतर काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या सिनेमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या केवळ या सिनेमाच्या चित्रीकरण स्थळाविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या विषयाची तसंच गुलदस्त्यात असणाऱ्या कलाकारांची नावं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.



हेही वाचा -

‘घाडगे & सून’चं ५०० भागांचं सेलिब्रेशन

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा