Advertisement

आयफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट, MX Player वर होणार प्रदर्शित

सिनेमाची आवड जोपासत दिग्दर्शकानं आशयघन कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

आयफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट, MX Player वर होणार प्रदर्शित
SHARES

यशापयाच्या समीकरणावर लढणारी लढाई ही नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाते. असाच शिखर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका नवोदित तरुणानं गाठला आहे. 

चित्रपट बनवण्याच्या वेडापायी त्यानं चक्क आयफोनवर सिनेमा चित्रित केला आहे. दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीनं पार पाडत दिगंबर वीरकर 'पिच्चर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


आयफोनवर चित्रित होणारा हा पहिला वहिला 'पिच्चर' सिनेमा 'वीरकर मोशन पिक्चर्स' निर्मित असून दिग्दर्शक दिगंबर वीरकर दिग्दर्शित आहे. सिनेमाची आवड जोपासत दिग्दर्शकानं आशयघन कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता चित्रित करण्यात आलेला या चित्रपटाची कथा अधिकच उत्सुकता वाढवणारी आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे यावर थोडक्यात चित्रपटाची कथा वळण घेते.

आयफोनवर चित्रित होऊन प्रदर्शित झालेला हा 'पिच्चर' चित्रपट गाण्यांशिवाय गावाकडील नजाखत उंचीवर नेत आहे. 

चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाला केदार दिवेकर याने पार्श्वसंगीत दिले असून चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर यानं केलं आहे.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक दिगंबर म्हणाले, "सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे आणि हे असे माध्यम आहे जे आपल्यातल्या कलागुणांना जोपासण्याचे बळ देते. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी सिनेमा हे एक मोठे माध्यम मला मिळाले आहे.

तसंच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गायकवाड, निलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या माझ्या मित्रांचा खारीचा वाटा आहे. आयफोनवर चित्रित करत मी हा 'पिच्चर' सिनेमा दिग्दर्शित केला असून हा सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा