Advertisement

'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ!


'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ!
SHARES

लहानपणी सर्वांनीच ऐकलेली एक गोष्ट 'लांडगा आला रे आला'. या गोष्टीत लांडगा आला म्हणून मुलगा खोडी काढतो आणि मग लांडग्याला शोधायला अख्खं गाव जमतं. आता या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्याऐवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल ना! अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात पाहायला मिळणार आहे.

गावात 'वाघ' शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येतं आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कला लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे आपल्या लग्नाला उभा असलेल्या वनअधिकाऱ्यालासुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात जावं लागतं. त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

ग्रामीण विनोदाचा वारू चौफेर उधळवणाऱ्या या ट्रेलरबरोबरच, 'उनाड पोरं' हे उडत्या चालीचं गाणेदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आलं.

'वाघेऱ्या' या सिनेमात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांची प्रमुख भूमिका आहे. सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदीदेखील आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे. 'वाघेऱ्या' गावात खरंच वाघ आला होता का? की फक्त एक अफवा होती? हे जाणून घेण्यासाठी येत्या १८ मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 'वाघेऱ्या' सिनेमा नक्की पाहायला जा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा