'शांताबाई'पासून 'सोनू'पर्यंत...

  Mumbai
  'शांताबाई'पासून 'सोनू'पर्यंत...
  मुंबई  -  

  संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. महाराष्ट्राला लोकसंगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. आधुनिक काळातही लोकसंगीतानं आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. एक वेळ अशी होती की, लोकसंगीताला घरघर लागण्याची चिंता होती. तरुणाईमध्ये हिंदी गाण्यांची क्रेझ जास्तच होती. त्यामुळे मराठी लोकगीतांवर नाकं मुरडली जायची. एक प्रकारे दर्जेदार मराठी लोकगीतांची वानवा जाणवू लागली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. मराठी लोकगीतांच्या चलतीपुढे हिंदी गीतांनीही नांगी टाकली आहे.

  सध्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर 'शांताबाई'पासून या लोकगीतांची पुन्हा चलती सुरु झाली. अनेक दर्जेदार लोकगीतं येऊ लागली आणि तुफान गाजलीही. तरुणाईची पावलं मग आपोआपच लोकगीतांवर थिरकू लागली. फक्त तरूणाईच नाही, तर बच्चे कंपनीच्या मनावरही या लोकसंगीतानं जादू केली. उत्सव कुठलाही असो, या गाण्यांचा बोलबाला असतोच.


  सोनु तुझा मायावर भरोसा नाय काय?

  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गाण्यानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'सोनु तुझा मायावर भरोसा नाय काय?' या गाण्यानं तरुणाईला भलतंच याड लावलंय.

  याचे गीतकार आहेत अजय क्षीरसागर, तर भाग्यशाली क्षीरसागर यांनी हे गाणं गायलं आहे. भाग्यशाली क्षीरसागर या अजय क्षीरसागर यांच्या पत्नी आहेत. या गाण्याचे संगीतकार आहेत चंदन क्षीरसागर. या गाण्यावरुन कित्येकांनी डबस्मॅश केलं आहे. या गाण्याचे डब केलेले अनेक व्हीडिओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   हे गाणं एवढं हिट ठरलं की, 93.5 रेडिओची जॉकी मलिष्कासुद्धा या गाण्याच्या प्रेमात पडली. याच गाण्यावर आधारीत 'मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?' हे गाणं मुंबईच्या फेमस रेडिओ जॉकी मलिष्कानं तयार केलं. मलिष्कानं या गाण्यातून मुंबईतल्या खड्यांची परिस्थिती मांडली आहे.  शांताबाई

  संजय लोंढे यांच्या 'शांताबाई'नं लोकगीतांना सुगीचे दिवस दाखवले. रूपाची खाण दिसते छान...शांताबाई...शांताबाई... हे गाणं संजय लोंढे यांनी त्यांच्या छोट्या मुलीसाठी लिहिलं होतं. संजय त्यांच्या लहान मुलीला मांडीवर घेऊन शांताबाई...शांताबाई हे गाणं गुणगुणत असायचे.  गणेशोत्सवाच्या तीन महिने आधी संजय यांनी हे गाणं कागदावर उतरवलं. पण भावाच्या उपचारासाठी पैशांची गरज होती, म्हणून संजय यांनी हे गाणं सुमीत या म्युझिक कंपनीसाठी गायलं. महाराष्ट्रात या गाण्याच्या लोकप्रियतेनं अक्षरश: शिखर गाठलं.


  कांताबायची सेल्फी

  'शांताबाई' या गाण्यानंतर 'कांताबाई' या गाण्यानंही चांगलाच धुमाकूळ घातला होता. 'कांताबाईची सेल्फी' असे या गाण्याचे बोल असून 'पप्पी दे पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.  'कांताबाईची सेल्फी' हे गाणं समर्थक शिंदे यांनी गायलं असून विनोद धोत्रे यांनी हे गाणं लिहिलं आहे. सेल्फीची जादू सगळीकडे पाहायला मिळते. मग कांताबाईला तरी सेल्फीचा मोह कसा आवरता येईल?


  आला बाबुराव

  'शांताबाई' आणि 'शालू'नंतर 'आला बाबुराव' या गाण्यानंही चांगली लोकप्रियता मिळवली आहे. उडती चाल आणि धमाकेदार शब्दांमुळे हे गाणं तरूणाईच्या पसंतीस उतरलं आणि बघता बघता चांगलंच लोकप्रिय झालं.  रोमिओ कांबळे यांनी हे गाणं गायलं आहे. तर मोनू अजमेरी यांनी संगीत दिलं असून ऋषिकेश कांबळे यांचे या गाण्याला बोल आहेत.


  कल्लूळाचं पाणी

  'कल्लूळाचं पाणी' तर सर्वांना नक्कीच लक्षात असेल. 'कल्लूळाचं' या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं 'गढूळाचं पाणी' असं झालं. हे गाणंसुद्धा तुफान चाललं.  मी तुझा परश्या, तु माझी आर्ची

  दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमानं अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं. सैराटमधील लोकप्रिय पात्र परश्या आणि आर्ची यांची जोडी अतिशय गाजली. या जोडीवर आधारित गाणं अजय क्षिरसागर यांनी लिहलं आहे. 'मी तुझा परश्या गं, तू माझी आर्ची' हे या गाण्याचे बोल आहेत. चंदन कांबळे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.  या गाण्यामध्ये आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी दाखवली आहे. हे गाणंही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालं.


  सुया घे पोत घे

  पुण्यात राहणारे प्रदीप कांबळे यांनी हे गाणं रचलं आहे. त्यांचाच आवाज या गाण्याला आहे.  काही तरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी हे गाणं लिहलं. पाहता पाहता महाराष्ट्रात हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं.


  देव धनगर वाड्यात घुसला

  'शांताबाई' या गाण्यापूर्वी संजय लोंढे यांनी 'देव धनगर वाड्यात घुसला' हे गाणं रचलं आहे. हे गाणं मकरंद सरदेशमुख यांनी गायलं आहे. या गाण्यानंही लोकप्रियतेचे नवे रेकॉर्ड बनवले.

  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.