Advertisement

रॉकबॅण्डच्या तालावर थिरकले भांडुपकर


रॉकबॅण्डच्या तालावर थिरकले भांडुपकर
SHARES

मुंबई - युवा फाऊंडेशन आणि समाजसेवक जितेंद्र घाडीगांवकर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पाहिल्याच कला महोत्सवाने भांडुपकरांवर मोहिनी घातली. विविध कला कलादालनमधील कलाकृती, लाइव्ह कार्यशाळा आणि पहिल्यांदाच भांडुपकरांच्या भेटीला आलेल्या एशान, मेलाडी फ्रंट, असर अशा प्रसिद्ध रॉक बँडमुळे कला रसिकांनी महोत्सव डोक्यावर घेतला. विविध कलांची सांगड घालणारा हा महोत्सव दरवर्षी व्हायला हवा, अशी मागणी भांडुपकरांनी आयोजकांकडे केली. रविवारी रात्री या महोत्सवाची सांगता झाली.

मराठी तरूणांचे रॉकबॅण्ड महोत्सवाचे विशेष आकर्षण होतं. भांडुपकर पहिल्यांदाच रॉकबॅण्डचा थरार अनुभवणार होते. त्यामुळे रविवारी सायंकाळी महोत्सवात रसिकांचा विशेषतः तरूणांची झुंबड उडाली होती. रॉकबॅन्डचे सादरीकरण सुरू होताच गर्दी आणखी वाढली. कला दालनातील प्रदर्शन पाहाण्यात मग्न रसिकही आपसूकच रॉकबॅन्ड ऐकण्या, पाहाण्यासाठी गर्दीत मिसळले. मेलोडी फ्रंट, असर, एशान आणि स्पर्शचा लीड सींगर सोहम पाठक यांनी हिंदी, मराठी गाणी सादर केली. एशानच्या तन्हा दिल, तन्हा सफर.. दिल चाहता है.. या गाण्यांनंतर तर बेभान झालेल्या भांडुपकरांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून वन्समोअरची गळ घातली.

दिवंगत सुधीर फडके कला दालनात रांगोळीकारांनी उभी केलेली मराठीहिंदी चित्रपटसृष्टी कलारसिकांना थक्क करून गेली. यात एव्हरग्रीन ब्युटी रेखा, अमिताभ बच्चन, पंडित भीमसेन जोशी, उस्ताद झाकिर हुसेन, निळू फुले, अमरीश पुरी, प्राण यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या पोट्रटेचा समावेश होता. या महोत्सवाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुंबई भाजपाचे सचिव निल सोमैया, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक श्रीपाद काळे उपस्थित होते. भांडूपकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता पुढच्यावर्षी आणखी मोठया स्तरावर, वैविध्यपूर्ण कला महोत्सव करू अशी प्रतिक्रीया जितेंद्र घाडीगावकर यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा