Advertisement

मुंबई महापालिकेत बहुमत मिळवणारच, भाजपचा निर्धार

नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात २०२२ मध्ये होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ‘मिशन मुंबई’ची रणनिती देखील ठरवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत बहुमत मिळवणारच, भाजपचा निर्धार
SHARES

महाविकास आघाडी राज्यातील सत्तेत स्थानापन्न होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेत (BMC) बहुमताच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात २०२२ मध्ये होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ‘मिशन मुंबई’ची रणनिती देखील ठरवण्यात आली आहे.

या संपूर्ण निवडणुकीच्या मोहिमेचं नेतृत्व अर्थातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp) करतील. तर या निवडणुकीसाठी कांदिवलीतून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार अतुल भातखळकर निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी कायम असणार आहे. मनोज कोटक, सुनील राणे, योगेश सागर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील मुंबई महापालिका निवडणुकीची विशेष जबाबदारी असेल.

हेही वाचा- कुणाच्या शंभर पिढ्या आल्या तरी, महापालिकेवरचा भगवा उतरणार नाही- संजय राऊत

मुंबई (mumbai) महापालिकेच्या मुख्यालयावर भाजपचा भगवा फडकेल. भाजप ११४ हून जास्त जागा ताब्यात घेऊन बहुमत मिळवेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कमी न लेखण्याचा सल्ला देखील नेते, पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे.

भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दुहेरी रणनिती आखली आहे. या रणनितीनुसार एका बाजूला शिवसेनेच्या (shiv sena) मराठी व्होटबँकला तोडताना दुसरीकडे दक्षिण भारतीय, गुजराती आणि इतर परप्रांतीयांची मतं मिळवण्याकडे भाजपचा फोकस असणार आहे. 

याआधी सन २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. या निवडणुकीत २२७ जागांपैकी शिवसेनेने ८६ जागा, तर भाजपने काटे की टक्कर देत ८२ जागा जिंकल्या. यावेळी भाजपने शिवसेनेसोबत सत्तेत वाटेकरी न होता पहारेकऱ्याची भूमिका निभावण्याचं ठरवलं होतं. यामुळे भाजपच्या हक्काचं विरोधी पक्ष नेतेपद देखील काँग्रेसच्या वाट्याला गेलं. तर महाविकास आघाडीच्या डावपेचांमुळे बहुतांश समित्या देखील शिवसेनेच्याच ताब्यात गेल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा