Advertisement

कुणाच्या शंभर पिढ्या आल्या तरी, महापालिकेवरचा भगवा उतरणार नाही- संजय राऊत

संजय राऊत यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कुणाच्या शंभर पिढ्या आल्या तरी, महापालिकेवरचा भगवा उतरणार नाही- संजय राऊत
SHARES

कुणाच्या शंभर पिढ्या जरी खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवर फडकणारा भगवा खाली उतरणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजपला केवळ मुंबईतील जमिनी, शेअर बाजार, आर्थिक उलाढालींमध्ये रस असून त्याचा वापर करून भाजपला मुंबईचं पायपुसणे बनवायचं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईसह महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. दिल्ली किंवा केंद्रातून जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आलं, तेव्हा मराठी माणूस आणि शिवसैनिक रस्त्यांवर उतरलेत. भाजपला मुंबई महाराष्ट्रात ठेवू द्यायची नाही आणि शिवसेना हे होऊ देत नसल्यानेच त्यांना दुःख होत आहे.

परराज्यातून आलेली एक नटी मुंबईला पाकिस्तानचा दर्जा देत होती, मराठी माणसाच्या आत्महत्येला जबाबदार माणसाला अटक झाल्यावर त्यांच्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली, गुजरातमधील मुख्यमंत्री इथं येऊन उद्योगपती यांना चिथावणी देते, तेव्हा भाजपचं मराठीप्रेम कुठं जातं असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. ते त्यांच्या सोयीचं राजकारण करत आहेत. राजकारणात कोणी विरोधी भूमिका घेत असेल तर, त्याच्या अंगावर जाण्याची आमची परंपरा नाही. आमच्यासाठी शिवरायांचा भगवा हा एकच भगवा आहे. मुंबई महापालिकेवर फडकणारा भगवा शुद्ध की फडणवीस यांचा भगवा शुद्ध हे आता मुंबईकरच ठरवतील असं संजय राऊत म्हणाले.

मुंबईत बुधवारी झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या सभेत बोलताना, डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असतं, मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचारी सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडवणीस यांनी केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा