Advertisement

भाजपचा सेनेवर 'राम'बाण !


भाजपचा सेनेवर 'राम'बाण !
SHARES

मुंबई – सत्ताधारी सेना-भाजपमध्ये कधीच शांतता होणार नाही का असा प्रश्न या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या विधानांना पाहून पडतो. दहिसरमध्ये झालेल्या तलाव उद्घाटन कार्यक्रमातून या दोन्ही पक्षांमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर थेट टीका केली आहे.

"मुंबईत आजच्या घडीला अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. अपुरा पाणी पुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, डेंग्युसारख्या आजारांचा विळखा अशा समस्या गंभीर झाल्या असताना मित्रपक्ष मात्र या समस्या सोडवण्यात नापास झाला आहे", अशा शब्दांत राम कदम यांनी गुरुवारी शिवसेनेवर निशाणा साधला.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर येथील जलतरण तलाव आणि व्यायाम शाळेचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन समारंभावर स्वत: महापौर स्नेहल आंबेकर यांनीच आक्षेप घेत एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची विनंती केली होती. "महापौरांनी जशी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची तत्परता दाखवली त्याप्रमाणे या नागरी समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवावी", असे म्हणत कदम यांनी महापौरांवर खरमरीत टीका केली आहे.

दरम्यान, भापजही पालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनाच कशी अपयशी असा प्रश्न कदम यांना विचारला असता, "भाजपची संख्या तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. तर दुसरीकडे सर्व निर्णय घेणारी पदे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे अपयशाचे खापर त्यांच्यावरच फुटणार आहे. आमच्याकडे महापौर पद द्या, आम्ही जर या समस्या सोडवण्यात अपयशी ठरलो तर मग आम्हाला जबाबदार ठरवा", असे म्हणत कदम यांनी भाजपची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा