Advertisement

अनिल परब, नीलम गोऱ्हे यांना कोर्टात खेचणार, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

अनिल परब यांना कोर्टात खेचण्याचा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

अनिल परब, नीलम गोऱ्हे यांना कोर्टात खेचणार, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यादरम्यान कुठल्याही परिस्थितीत गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करुन राणे यांना ताब्यात घ्या, असे आदेश देताना शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब दिसून आले होते. यावरून त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती देताना चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं आहे की, अनिल परब यांच्याबाबत आम्ही कोर्टात याचिका करणार आहोत. त्यांची क्लिप काल जगानं पाहिली. किती कायदा हातात घेणं चाललंय? किती अरेरावी चाललीये? पोलिस आणि गुंडांच्या बळावर हे सरकार चाललंय. त्यामुळे ती क्लिप घेऊन आम्ही न्यायालयात जातोय. 

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली हा संदर्भ देताना मुख्यमंत्री उद्धवजी चुकले, हे झाकण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. मारण्यासाठी मातोश्रीवर जाईन, शोधून मारेन असं काहीही राणेसाहेब म्हणालेले नव्हते. एखाद्या वाक्याबाबत समजावण्याची व्यवस्था आहे. पण इतकं टोक गाठणं चुकीचं आहे. 

हेही वाचा- झिशान सिद्दीकी बनले मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष

ज्या एका वाक्यावरून इतका कोलाहल निर्माण केला,ते वाक्य काय आहे? पण मुख्यमंत्री उद्धवजींनी स्वातंत्र्याबाबतचा संदर्भच चुकवला. त्यांना अजिबात ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारही नाही. ते राहिलं बाजूलाच, उलट ते झाकण्यासाठी राणे राणे जप करत अटकेचं सूडनाट्य रचलं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या वक्तव्याची पाठराखण केली.

भोक तुमच्या फुग्याला पडलंय. राऊतसाहेब, आरोप करणाऱ्या महिलेलाच तुम्ही जेलमध्ये दाबता. सत्तेचा दुरुपयोग करता. उपसभापती असूनही नीलमताई शिवसेना प्रवक्त्यासारखं बोलतात. त्यांनाही आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. त्या उपसभापती असूनही राणेंना दुतोंड्या कसं म्हणतात, हे कोर्टातच विचारू, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नीलम गोऱ्हेंना देखील न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीबाबत मी कुटुंबीयांशी संपर्कात आहे. वैद्यकीय उपचार मिळत असल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. थोडीशी विश्रांती घेऊन लढाऊ राणेसाहेब पुन्हा त्याच तडफेने काम करू लागतील, असा विश्वास मी महाराष्ट्राला देतो, असं त्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा