काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

भायखळा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना डावलून माजी आमदार मधू चव्हाण यांना पुन्हा काँग्रेसकडून संधी देण्यात आली. यामुळे जामसुतकर नाराज होते.

SHARE

ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भायखळातील वाॅर्ड क्रमांक २१० च्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जामसुतकरांचं मन वळवण्यात पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांचा मोठा हात असल्याचं बोललं जातं. भायखळा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना डावलून माजी आमदार मधू चव्हाण यांना पुन्हा काँग्रेसकडून संधी देण्यात आली. यामुळे जामसुतकर नाराज होते. जामसुतकरांपाठोपाठ मुंबादेवीतील माजी नगरसेवक सुर्यकांत पाटीलही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

भायखळा मतदार संघामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व मुंबादेवी मतदार संघातील माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीत भायखळा मतदारसंघातील जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना नक्कीच फायदा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भायखळा येथून मनोज जामसुतकर काँग्रेसकडून निवडून आले होते. पुढे हा मतदारसंघ महिला आरक्षित झाल्याने जामसुतकर यांनी त्यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यांना वॉर्ड क्रमांक २१० मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर प्रयत्नात होते.

नाराज असलेल्या जामसुतकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं. जामसुतकर यांना मानणारा मतदार मोठ्या संख्येने भायखळा मतदारसंघात आहे. तर मुंबादेवी परिसरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील हे देखील शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पाटील यांचा परिसरातील दांडगा जनसंपर्क आणि वैयक्तिक कामामुळे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात त्यांना मानतात. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबादेवी मतदारसंघातील मते शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना मिळतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या दोन्ही नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतं.हेही वाचा - 

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...

रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या