Advertisement

सेना-भाजपा, भूमिपूजन आणि मानापमान

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाची भाषा सातत्यानं करत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिंगावर घेताना दिसतात. त्याचवेळी भाजपा मात्र सेनेला गोंजरताना दिसतो, युतीचे संकेत देताना दिसतो. पण प्रत्यक्षात मात्र युतीसाठी ठोस प्रयत्न करताना काही दिसत नाही. उलट मेट्रो-५ आणि पंतप्रधान आवास योजनेतील सिडकोच्या ९० घरांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून तर हे प्रकर्षानं पुढं आलं आहे.

सेना-भाजपा, भूमिपूजन आणि मानापमान
SHARES

शिवसेना-भाजपा, एक महाराष्ट्रातील मोठा प्रादेशिक पक्ष, तर एक केंद्रासह अनेक राज्यात सत्तेत असलेला आणि देशातील सर्वात मोठा पक्ष. या दोन्ही पक्षाचा २५ वर्षांपासून सुखाचा संसार सुरू होता. पण गेल्या एक-दोन वर्षांपासून या दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं आहे, वादविवाद सुरू झाले आहेत. हे वादविवाद अगदी ब्रेकअपपर्यंत गेले आणि आता तर काडीमोड घेण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाची भाषा सातत्यानं करत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिंगावर घेताना दिसतात. त्याचवेळी भाजपा मात्र सेनेला गोंजरताना दिसतो, युतीचे संकेत देताना दिसतो. पण प्रत्यक्षात मात्र युतीसाठी ठोस प्रयत्न करताना काही दिसत नाही. उलट मेट्रो-५ आणि पंतप्रधान आवास योजनेतील सिडकोच्या ९० घरांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून तर हे प्रकर्षानं पुढं आलं आहे.

पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा भव्यदिव्य सोहळा कल्याणमध्ये रंगणार असून या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यामुळं शिवसेनेच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून या कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार टाकला आहे. तर भाजपा-सेनेमधील धुसफूस गेल्या महिन्याभरात चांगलीच वाढली असल्यानं भाजपा कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यामुळं सेना-भाजपातील मनं दुरावलेली असताना हे अंतर आता आणखी वाढण्याची चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे केंद्रातील त्यावेळच नेते अटबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तसंच राज्यातील गोपीनाथ मुंडे तसंच प्रमोद महाजन या नेत्यांनी सेना-भाजपाचा संसार वर्षानुवर्षे सुखानं चालवला. पण आता सेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात, तर भाजपाची सूत्र अमित शहा-नरेंद्र मोदी या जोडगोळीच्या हातात गेली असून सेना-भाजपामध्ये काहीही अलबेल राहिलेलं नाही.

सेना-भाजपामध्ये नेमकं असं काय झालं की कधी कुणी स्वप्नातही हे दोन पक्ष आपल्या वेगळ्या चुली मांडण्याची भाषा करतील असं वाटलं नसेल. गेल्या साडेचार वर्षांत भाजपानं फक्त आणि फक्त खोटीच आश्वासन दिली, राज्यातल्या, देशातल्या जनतेसाठी काहीही केलं नाही. त्यातच ज्या राम मंदिराच्या मुद्दयावर भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आलं त्याच राम मंदिराचा विसर मोदींना आणि भाजपाला पडल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा विषय उचलून धरला. इतकंच नव्हे, तर त्यांनी आयोध्या दौरा करत भाजपाला चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला.

यापुढं जात सेना-भाजपाध्ये मानापमान नाट्य रंगलं आहे. मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा आणि उद्धव ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा घाट नुकताच शिवसेनेनं घातला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका भव्य सोहळ्यात कोस्टल रोडचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सेनेकडून वा महापालिकेकडून भाजपाला निमंत्रणचं देण्यात आलं नाही. मुख्यमंत्री नाही की भाजपाचा कुणीही मंत्री नाही. या भुमिपूजन सोहळ्यानं भाजपा कार्यकर्ते दुखावले. कारण, कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय लाटण्याची चढाओढ भाजपासह सेनेमध्ये पोस्टरबाजीच्या माध्यमातून दिसून आली.

कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा वचपा काढण्यासाठी तसंच नुकत्याच झालेल्या ३ राज्यातील पराभवानंतर जनतेसमोर काही तरी ठोस घेऊन येण्यासाठी भाजपानं मेट्रो-५ आणि सिडकोच्या ९० हजार घरांच्या भूमिपूजनाचा घाट घातला, तोही अचानक. मंगळवारी मोदी राज्यातील ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपुजन करत असताना या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निंत्रणचं देण्यात आलेलं नाही. निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचं नावही नाही.

उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्यानं ठाण्याचे पालकमंत्री तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर पिंपरी मेट्रोच्या भूमिपूजनाला सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे हेही दांडी मारणार आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने, नेत्याने आणि कार्यकर्त्याने भूमिपूजनाला जाऊ नये असे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. या आदेशानंतर, सेनेच्या बहिष्कारानंतर सेना-भाजपामध्ये तणाव निर्माण झाल्याचंही चित्र आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य सुरू झालं आहे. दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. तेव्हा हे मानापमान नाट्य असंच आणखी काही दिवस सुरू राहतं की निवडणुकाचे बिगुल वाजण्याआधी दुरावलेली मनं पुन्हा जुळून संसार नव्यानं सुरू होतो हे आता लवकरच समजेल.



हेही वाचा-

२० डिसेंबरला शिवस्मारकाचं पुन्हा भूमिपूजन!

कोस्टल रोडच्या भूमीपूजनात मुख्यमंत्र्यांना डावललं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा