वडेट्टीवारांची नाराजी दूर, ‘हे’ नवं खातं मिळालं

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम खातं देण्यात आल्याचं म्हणत नाराज झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर ५ दिवसांनी दूर झाल्याचं म्हटलं जात आहे.

SHARE

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम खातं देण्यात आल्याचं म्हणत नाराज झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर ५ दिवसांनी दूर झाल्याचं म्हटलं जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून चांगलं खातं देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर वडेट्टीवार सरकारी कामकाजात पुन्हा सक्रीय झाले आहेत. 

विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत. त्यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.   

हेही वाचा- महापालिका पोटनिवडणुकीत मानखुर्दमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय 

ज्येष्ठ नेता असूनही मंत्रिमंडळात दुय्यम खातं देण्यात आल्याचं म्हणत ते नाराज झाले होते. त्यामुळे मागील ५ दिवसांपासून त्यांनी पक्ष सहकाऱ्यांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांसोबतचा संपर्क तोडला होता. शिवाय सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आणि एकदिवसीय विशेष अधिवेशनालाही ते गैरहजर होते.  

अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांची समजूत घातली आणि पक्षनेतृत्वासोबत चर्चा घडवून आणली. त्यानुसार वडेट्टीवार यांना मदत व पुनर्वसन खातं देण्यात आलं आहे. सध्या हे खातं शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे आहे. 

हेही वाचा- अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

संबंधित विषय
ताज्या बातम्या