Advertisement

निरूपम म्हणतात, धर्मा पाटील यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या


निरूपम म्हणतात, धर्मा पाटील यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या
SHARES

जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयाच्या दरात विष प्राशन केल्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही खडबडून जाग आली. तत्पूर्वी त्यांच्यावरील अन्यायाची दखल घेण्याची सवडही कुणाला मिळाली नव्हती. जे. जे. रुग्णालयात ६ दिवस धर्मा पाटील यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपल्यावर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या प्रकरणावरून कलगी तुरा रंगला आहे. त्यातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी 'कर्जबाजारीपणा'मुळे धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट करत याप्रकरणी राजकारण्यांना किती गांभीर्य आहे, याचं सूचक उदाहरण दिलं आहे.

एकाबाजूला सरकारकडून शेतकऱ्यांवर कसा अन्याय केला जातो, शेतकऱ्यांची कशी थट्टा केली जात अाहे, यावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्य सरकारला टार्गेट केलं जात आहे. पण ज्या प्रकरणावरून आपण सरकारवर ताशेरे ओढत आहोत, ते प्रकरण स्वत:ला कितपत माहीत आहे, याचीही खातरजमा करावीशी या नेतेमंडळींना करावीशी वाटत नाही, हेच मोठं दुर्दैवं.



याचा नमुदा द्यायचा झाल्यास काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांना धर्मा पाटील यांनी का विष प्राशन केलं? हेच मुळात माहीत नसल्याचं दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे निरूपम यांनी नुकतंच धर्मा पाटील यांच्या निधनावर ट्विट केलं असून त्यात त्यांनी धर्मा पाटील यांनी 'कर्जबाजारीपणा'ला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हणत सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

मंत्रायलायच्या दरात विष प्रशान करणाऱ्या धर्मा पाटील यांना सरकारनं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही की त्यांचं कर्जही माफ केलं नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील मृत्यूशी झुंज देत असताना मुख्यमंत्री मात्र दावोसमध्ये फिरत होते, असं निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विरोधी पक्षातील नेता म्हणून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून सरकारवर निशाणा साधणारे निरूपम धर्मा पाटील प्रकरणाबाबत इतके अनभिज्ञ कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा