आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल? अधिवेशन काळात विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार?सरकारला कोणत्या मुद्द्यांवरून धारेवर धरणार? यासाठी काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम तसंच विविध आघाड्यांवर सरकारचं अपयश आदींबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, प्रतोद आ. संजय दत्त, आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. भाई जगताप, आ.प्रा. वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
फसवी कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्यान होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या.
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक असून, त्यामध्ये सरकारविरोधातील रणनितीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज आहेत. अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णयही ते घेऊ शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समितीची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
एकीकडे नीरव मोदी प्रकरणी विरोधक मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींनी या प्रकरणात अद्याप मौन बाळगलेलं आहे. तर दुसरीकडे मोदी अर्थमंत्री जेटलींवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.