मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक
मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक
See all
मुंबई  -  

मोदी सरकारला शुक्रवारी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या तीन वर्षात मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेसने आझाद मैदानात निषेध केला. युपीए सरकारने केलेली कामे, त्याकाळात झालेला विकास आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना दाखवणारे चित्रही यावेळी मुंबई काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानात लावण्यात आले. देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही लोकांच्या बाजूने आहोत. समाजातील सर्व घटकांनी भाजपाच्या विरोधात उठले पाहिजे, असं सांगत अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. देशात सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात आहे. मागच्या पंचवीस दिवसात सहा रुपये वाढवले आहे. महागाईने जनतेचे जीवन कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, सैनिकांच्या हत्या होत आहेत. सामान्य जनतेपेक्षा मोठ्या भांडवलदारांना मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी यावेळी केला.

आपल्याला या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. काँग्रेसच्या माध्यमाने लोकांसाठी आता अच्छे दिन आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरकरांना भारतरत्न देण्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये धक्काबुक्की

दरम्यान, फलटण येथील भाजप कार्यकर्ते संभाजी काकडे यांनी हातात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हातात घेऊन सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी या कार्यकर्त्याला मैदानाच्या बाहेर जाऊन घोषणा देण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. काकडे या कार्यकर्त्याला यावेळी काँगेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण थोडे निवळले. पोलिसांनी काकडे यांना काँग्रेसच्या सभेच्या जागेपासून दूर अंतरावर जाऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.