Advertisement

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार

येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार
SHARES

येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. कोणत्या पक्षातून कोण उमेदवार असणार अशा चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशातच मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

या निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व २३६ जागांवर उमेदवार उभे करेल, अशी घोषणा काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी केली. ''हम पुरा लडेंगे और पुरा जितेंगे'', असा नाराही त्यांनी यावेळी दिला. मुंबईच्या गवालिया टॅंक परिसरातील तेजपाल हॉलमध्ये मंगळवारी काँग्रेसचा १३७ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भाई जगताप बोलत होते. यावेळी भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची ही परंपरा भविष्यात अशीच टिकून राहणार आहे आणि राहायलाच हवी. कारण आज ज्या भयावह परिस्थितीतुन देश जात आहे. त्यातून देशाला वाचवण्यासाठी देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे.

केंद्रातील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला फकीर म्हणवतात. फकीर आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहेत. पण असा फकीर आम्ही कधीही पाहिलेला नाही, जो दिवसाला ४ वेळेला आपला पोशाख बदलतो, ज्याने ६२७ करोडचे विमान १६२० करोड रुपयांना विकले असा फकीर आपण कधीही पाहिलेला नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.

देशातील जनता महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी त्रस्त आहे. पण केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला त्याचे काहीही पडलेले नाही. हे गरिबांचे सरकार नाही. हे सरकार फक्त देशातील नरेंद्र मोदी यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचे आहे आणि त्यांच्या सोयीनुसारच ते चालते.

ज्यावेळेस देशाचा अन्नदाता शेतकरी काळे कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून राजधानी बाहेर लाखोंच्या संख्येने आंदोलन करत होता. अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते आंदोलनजीवी म्हणून संबोधतात. अशा मुजोर भाजप सरकारला चले जावं म्हणण्याची आज वेळ आली असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यावेळेस बोलताना म्हणाले की, आज आपले सौभाग्य आहे की, आपण अशा सभागृहामध्ये बसलेलो आहोत, जिथे १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशाला घडविण्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे, जे आपण कधीही विसरू शकत नाही.

पण आज देशामध्ये अशी बिकट परिस्थिती आलेली आहे, जिथे देशातील केंद्र सरकार समाजकारण न करता ध्रुवीकरणाला महत्व देत आहे. मला वाटते की, आपले पूर्वज मग ते सरदार वल्लभभाई पटेल असोत, महात्मा गांधी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत किंवा दादाभाई नौरोजी असोत, त्यांनी कधी असा विचार केला नसेल की, एके दिवशी या देशात असे सरकार येईल ज्याच्या कार्यकाळात समाजकारण दुर्लक्षित करून ध्रुवीकरणाला महत्व दिले जाईल.

कधी महात्मा गांधी यांनी असा विचार केला नसेल की, या देशात अशी सुद्धा वेळ येईल जेव्हा एक पंतप्रधान खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधींचा फोटो काढून स्वतःचा फोटो लावतील. या देशामध्ये आता आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्यांचे सरकार बनलेले आहे.

आज काँग्रेसचा स्थापना दिवस आहे, एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आज आपण संकल्प करायचा आहे की, आपल्याला या जातीयवादी ढोंगी लोकांच्या विरुद्ध लढायचे आहे. यांच्या जातीयवादी विचारांशी आपल्याला लढा द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा