मुलुंड - सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना विरोधात काँग्रेसनं बुधवारी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर अनोखं आंदोलन केलं. राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरणाच्या विरोधात काँग्रेस पक्षानं घरातील खुर्ची, सिलिंडर, भांडी इत्यादी सामान रस्त्यावर मांडून त्याच्या गराड्यात राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. घरातून थेट रस्त्यावर येणाऱ्या सामान्य जनतेचे हाल प्रातिनिधीक स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने या आंदोलनातून केला. या आंदोलनाचं संपूर्ण आयोजन इशान्य मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी केलं होतं. 'राज्य सरकारच्या या नव्या गृहनिर्माण धोरणांमुळे गरीब जनता अक्षरशः रस्त्यावर येणार आहे. हे धोरण मागे घेण्यात यावे' अशी मागणी राजेश इंगळे यांनी केली.