Advertisement

'त्या' पुस्तकाच्या लेखक, प्रकाशकावर कारवाई करा - धनंजय मुंडे


'त्या' पुस्तकाच्या लेखक, प्रकाशकावर कारवाई करा - धनंजय मुंडे
SHARES

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचं फक्त वितरण थांबवून चालणार नाही तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसंच याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


कारवाईची केली मागणी

सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक भाषिक पुरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत पुरवण्यात आलेल्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने या पुस्तकाचं वितरण थांबवून लेखक, प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनी केली होती.


माफी मागा, राजीनामा द्या

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणेचे उपसंचालक विकास गरड यांनी पत्रक काढून सदर पुस्तकाचं वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पुस्तक वितरणाचे आदेश थांबवून चालणार नाही, तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकावर कारवाई केली पाहिजे. तसंच राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

राज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचं सरकार असल्यामुळेच वारंवार या घटना घडत असून मनुस्मृतीचा प्रचार करणाऱ्या मनोहर भिडेंसारख्या व्यक्तींना हे सरकार पाठीशी घालत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य येतेच कसं? आणि सरकार ते सहन कसे करते? असा सवालही मुंडे यांनी केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा