
या दोन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरण आणि शहराच्या नागरी पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. आदित्य ठाकरे रहिवाशांच्या हरकती ऐकून प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करणार असून संध्याकाळी माध्यमांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका आणि महामेट्रोकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहरांतर्गत कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंटरनल रिंग मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
मात्र, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता, खारफुटी क्षेत्रावर परिणाम आणि बांधकामादरम्यान वाहतुकीत होणारा अडथळा याबाबत रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी पोखरण रोड क्रमांक 2 वर रहिवाशांनी मानवी साखळी तयार करून रिंग मेट्रो कॉरिडॉरची गरज आणि त्याचा शहरावर होणारा परिणाम यावर प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले होते.
आदित्य ठाकरे बालकुममधील Amazonच्या प्रस्तावित हायपरस्केल डेटा सेंटरबाबतही स्थानिक रहिवाशांशी चर्चा करणार आहेत.
53 एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे पाणी आणि वीज पुरवठ्यावर अतिरिक्त ताण, वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केली आहे.
याआधीही या प्रकल्पाच्या वीज वापर, पाण्याची गरज आणि मोठ्या संख्येने बॅकअप जनरेटर उभारण्याच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या आक्षेपांवर Amazonने स्पष्टीकरण देताना भारतातील त्यांच्या डेटा सेंटरमध्ये कूलिंगसाठी पाण्याचा वापर केला जात नाही, असे म्हटले आहे.
ठाणे प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला पाणीपुरवठा केवळ कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत गरजांसाठी वापरला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकल्पाला वीज पुरवठा स्थानिक वितरण यंत्रणेवर भार न टाकता स्वतंत्र उच्च-दाब उपकेंद्रातून केला जाईल, असेही कंपनीने सांगितले आहे.
आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे ठाण्यातील या दोन्ही प्रकल्पांभोवतीचा वाद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता असून, या विषयावर ते नेमकी कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
