Advertisement

ठाणे-दिघे, सानपाडा आणि टिटवाळा-खडवलीत ऑल-वेदर सबवे बांधणार

रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका होणार कमी

ठाणे-दिघे, सानपाडा आणि टिटवाळा-खडवलीत ऑल-वेदर सबवे बांधणार
SHARES

भिवंडी रोडजवळ ऑल-वेदर सबवे यशस्वीपणे सुरू केल्यानंतर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) आणखी तीन ते चार धोकादायक ठिकाणी अशाच प्रकारचे सबवे उभारण्याची तयारी सुरू केली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्याच्या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात येणार आहे.

MRVCने सध्या ठाणे-दिघे, सानपाडा कारशेड आणि टिटवाळा-खडवली या तीन ठिकाणांची ओळख पटवली आहे. चौथे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. हे सर्व प्रकल्प सध्या नियोजनाच्या टप्प्यात असून, सबवेची अंतिम रचना, आकारमान आणि तांत्रिक आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही.

भिवंडी रोड सबवे ठरणार मॉडेल

भिवंडी रोड स्थानकाजवळ पनवेल-वसई रोड मार्गावरील सात कार्यरत रेल्वे रुळांखाली हा ऑल-वेदर सबवे उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेल्वे वाहतूक विस्कळीत न करता हायड्रॉलिक पुशिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने चार मोठे प्रीकास्ट आरसीसी सेगमेंट कार्यरत रुळांखाली बसवण्यात आले.

सबवेमध्ये पाणी झिरपू नये यासाठी अनेक स्तरांचे वॉटरप्रूफिंग आणि संरक्षक मेम्ब्रेन बसवण्यात आले आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी लागू असलेल्या लोडिंग मानकांसह जड मालवाहतुकीचा भार सहन करण्याच्या दृष्टीने या रचनेची क्षमता ठेवण्यात आली आहे.

सबवेला झाकलेले प्रवेशमार्ग, प्रकाश व्यवस्था, वायुवीजन आणि ड्रेनेजची सुविधाही देण्यात आली आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांना रेल्वे रुळ न ओलांडता सुरक्षितपणे मार्गक्रमण करता येत असल्याने स्थानिक संपर्क व्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे.

तीन ठिकाणी तातडीची गरज

रेल्वे रुळांवरून अनधिकृतपणे जाणाऱ्या नागरिकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी असुरक्षित ठिकाणी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचा MRVCचा प्रयत्न आहे. भिवंडी रोड येथील ऑल-वेदर सबवेच्या धर्तीवर ठाणे-दिघे, सानपाडा कारशेड आणि टिटवाळा-खडवली या भागांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या ठिकाणांचे पुढील मूल्यांकन केल्यानंतर सबवेची अंतिम ठिकाणे, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन निश्चित केले जाणार आहे.



हेही वाचा

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा