देशाला इव्हेंटची नाही, इलाजाची गरज, बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका

मोदींनी अशा संकटाच्या काळात इव्हेंट करण्याऐवजी इलाजाचा विचार करायला हवा होता, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

देशाला इव्हेंटची नाही, इलाजाची गरज, बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका
SHARES

कोरोनाची लढाई (coronavirus) महत्त्वाच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली असताना देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावून एकजुटीचं प्रदर्शन घडवण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मोदींनी अशा संकटाच्या काळात इव्हेंट करण्याऐवजी इलाजाचा विचार करायला हवा होता, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (congress maharashtra president balasaheb thorat) यांनी केली आहे.

थाळी-टाळीनंतर आता देशात दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला इव्हेंटची नव्हे, तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर, चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं हे प्रसिद्धी स्टंट बंद करून पंतप्रधानांनी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं थोरात म्हणाले.

देशातील कोरोनाचं संकट (covid-19) अधिक गंभीर होत चालल्याचं आपल्या सगळ्यांनाचं दिसत आहे. अशा परिस्थितीत आपले पंतप्रधान मागे टाळ्या वाजवायला सांगितल्या आता दिवे लावायला सांगत आहेत. कधी हे पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का? देशाचे पंतप्रधान म्हणून निर्णय घेणार आहेत का? सध्याच्या स्थितीत गरज आहे ती वैद्यकीय साधनसामुग्री पुरवणं, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं, नागरिकांना धीर देणं, ते सोडून दिलं आणि टाळ्या वाजवा, दिवे लावा, हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? त्यांनी आणखी गंभीर व्हायरची गरज आहे, असंही थोरात यांनी सांगितलं.

शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतात जनतेला ईश्वराचं रुप समजलं जातं आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या अंधः कारातून बाहेर पडण्यासाठी मी जनतेकडे काही मागत आहे. मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व दिवे, लाइट्स ९ मिनिटे बंद करुन बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “कोरोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. मात्र, हे करत असताना जनता कर्फ्यूवेळी चूक करू नका. तुम्हाला सोशल डिस्टन्सिग पाळायचं आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. कुठेही गर्दी करायची नाही. एकटं राहायचं आहे. एकटं राहुनच हे करायचं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे, असं मोदी म्हणाले.


संबंधित विषय