Advertisement

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्राॅम होम’, ई-मेल, व्हाॅट्सअॅपवरून करता येईल काम

राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ची अर्थात घरून काम करण्याची सुविधा देऊ केली आहे.

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्राॅम होम’, ई-मेल, व्हाॅट्सअॅपवरून करता येईल काम
SHARES
Advertisement

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सध्या सर्व सरकारी कार्यालये कमीत कमी मनुष्यबळासह कार्य करत आहेत. अशा स्थितीत मागील दोन ते अडीच महिन्यांपासून खोळंबलेल्या कामाचा निपटारा करण्यासाठी आता राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ची (coronavirus live updates maharashtra government employee allowed work from home through email and whatsapp during covid 19 lockdown) अर्थात घरून काम करण्याची सुविधा देऊ केली आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं काढलं आहे.  

आॅनलाइन काम

कोरोना विषाणूचा (covid-19) प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये तसंच राज्यातील अधिकारी/कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. याचसोबत महत्त्वाची बाब म्हणजे ई-मेल आणि व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना ग्राह्य धरण्यात यावं, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - अन्यथा, सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार, कारण काय?


काय म्हटलंय परिपत्रकात?

लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रीत करण्यात येत आहे. तसंच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या घरातच राहून कार्यालयीन आवश्यकतेनुसार आणि तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे. यासाठी शासकीय ई-मेल (जसं एनआयसी मेल इ.) त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल तसंच व्हाॅट्सअॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी तसंच संबंधितांना सूचना/आदेश देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. 

  • त्यानुसार प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय ई-मेल आयडी/ त्यांच्या नेहमीच्या वापरातले अन्य ई-मेल आयडी तसंच एसएमएस/व्हाॅट्सअॅपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक त्यांच्या कार्यालय प्रमुखास उपलब्ध करून द्यावा.
  • शासकीय कामकाजासाठी शासकीय ई-मेल आयडी/ त्यांच्या नेहमीच्या वापरातला अन्य ई-मेल आयडी तसंच व्हाॅट्सअॅपचा वापर करून त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त निपटारा करावा. 
  • प्रस्ताव ई-मेल द्वारे फाॅरवर्ड केल्यानंतर त्याबाबतची सूचना लगेच संबंधितास एसएमएस/व्हाॅट्सअॅपवरून देण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.
  • उक्त पद्धतीने वरिष्ठांकडून प्राप्त सूचनेनुसार ई-मेलद्वारे अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला (फाॅरवर्ड केलेला) प्रस्ताव हा तो सादर करणारे व अंतिम मान्यता देणार या दोन्ही स्तरामधील अधिकाऱ्यांनी पाहिला, तपासला व मान्य केला आहे, असं गृहित धरण्यात येईल. 
  • प्रस्ताव सादर करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रस्ताव ई-मेलद्वारे अंतिमत: फाॅरवर्ड करण्यापूर्वी तो संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून फाॅरवर्ड करावा. व त्याची प्रत (सी.सी.मध्ये) सर्व संबंधित अधिकाऱ्यांना चिन्हांकित करावी.
  • तरी, सर्व मंत्रालयीन अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव तसंच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख तसंच कार्यालय प्रमुख यांना सदर सूचना त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी यांच्या निर्दशनास आणाव्यात, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा - अनुपस्थित कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका, कामावर हजर न राहिल्यास नोकरी जाणार

संबंधित विषय
Advertisement