Advertisement

रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रासोबत रडीचा डाव खेळतंय, अनिल परब यांचा आरोप

गाड्याच्या वेळापत्रकात गोंधळ करायचा आणि सर्व दोष महाराष्ट्र सरकारच्या माथी मारायचा असा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रासोबत रडीचा डाव खेळतंय, अनिल परब यांचा आरोप
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेकडून कमी गाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगितल्यावर मिरची झोंबलेल्या रेल्वे मंत्रालयाने रात्री अडीच वाजता महाराष्ट्रासाठी गाड्यांचं शेड्युल पाठवलं आणि महाराष्ट्र सरकार गाड्यांचं नियोजन करताना सहकार्य नसल्याची बोंबाबोंब केली. अशाप्रकारे केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठीच रेल्वे मंत्रालय रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला. 

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पियुष गोयल यांच्या आरोपांचं उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना आम्ही केंद्राकडे दररोज ८० गाड्या पाठवण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ३० गाड्या मिळाल्याचं सांगितलं होतं. यावर चिडून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली.

अडीच वाजता शेड्युल

१ मे पासून २४ मे २०२० पर्यंत जवळपास ५५५ गाड्यांमधून ७ लाख ७६ हजार मजूर परराज्यातील आपापल्या गावी गेले आहेत आणि २६ मे पासून पुढे आम्ही १७२ गाड्यांची मागणी केली असताना, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अचानक रात्री अडीच वाजता गाड्यांचं शेड्युल पाठवण्यात आलं. यांत पश्चिम बंगालसाठी आम्ही फक्त ४८ गाड्यांची मागणी केली होती. असं असताना एका दिवसांत पश्चिम बंगालसाठी ४३ गाड्यांचं शेड्युल करण्यात आलं. 

एका दिवसात ४३ गाड्या

पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेलं असल्याने तेथील सरकारने दररोज केवळ २ गाड्या सोडण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. ही विनंती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती. तरीही एका दिवसात ४३ गाड्या सोडून केंद्र सरकार असं दाखवतंय की आम्ही तर गाड्या देतोय पण महाराष्ट्र सरकारमध्ये लोकं पाठवण्याची ताकद नाही. पश्चिम बंगामध्ये वादळ असल्याने पुढील २ दिवसांत आपण तेथे जाणाऱ्यांची व्यवस्था करणार आहोत. तोपर्यंत तिथं जाणाऱ्यांनी महाराष्ट्रातच थांबावं, अशी मी विनंती करतो, असं अनिल परब म्हणाले.

वेळापत्रकात गोंधळ

हा रडीचा एवढ्यावरच थांबलेला नाही. तर अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या शेड्युलमधील बहुतांश गाड्या या दुपारी १२ वाजेच्या होत्या. रात्री ईदची ड्युटी आटोपून घरी गेलेल्या पोलिसांना सकाळी ८ वाजता कळतं की दुपारी १२ वाजता गाड्या सोडायच्या आहेत, जे शक्य नाही. म्हणून केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा डाव रेल्वे मंत्रालय करत आहे. गोरखपूरला जाणारी ओडीसाला गेली. आज सीएसटी, पनवेल, सोलापूर स्टेशनच्या बाहेर लोकं उभी आहेत, तरी गाड्या वेळेवर सुटत नाही. गाड्याच्या वेळापत्रकात गोंधळ करायचा आणि सर्व दोष महाराष्ट्र सरकारच्या माथी मारायचा असा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा