Advertisement

संकट गंभीर; पण सरकार खंबीर - मुख्यमंत्री

संकट गंभीर असलं, तरी सरकार खंबीर असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मंगळवारी दिलं.

संकट गंभीर; पण सरकार खंबीर - मुख्यमंत्री
SHARES

कोराेनाचा (Coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. परंतु असं असूनही काही लोकं बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस आवश्यक गोष्टींची खरेदी करू देण्यासाठीही बाहेर पडू देत नसल्याची तक्रार काही लोकं करत आहेत. आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की संचारबंदी सहज म्हणून लावण्यात आलेली नाही. परिस्थिती गंभीर असल्यानेच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पण संकट गंभीर असलं, तरी सरकार खंबीर असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मंगळवारी दिलं.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 

परिस्थितीचं भान राखा

करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून 'हे करोना ते करोना' असे मी सारखं म्हणणार नाही. पण तुम्ही परिस्थितीचं भान राखावं हिच माझी अपेक्षा आहे. राज्यात पुरेसं अन्नधान्य उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारने जनतेचं जगणं थांबवलेलं नाही, तर अधिक जगण्यासाठी थोडीशी शैली बदलावी लागली आहे. धान्य, दूध, औषधे आणण्यासाठी तुम्ही निश्चितच घराबाहेर पडा, पण नुसती टेहळणी करण्यासाठी आणि फेरफटका मारायला बाहेर पडू नका. तुम्ही रास्त कारणासाठी घराबाहेर पडला असाल आणि तुम्हाला कुणी अटकाव करत असेल तर पोलिसांना १०० नंबरवर कळवा. पोलीस तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील  

शहरात जीवनावश्यक वस्तूंची ने आण थांबता कामा नये. शेतकऱ्याला शेतात जाऊ दिलं पाहिजे. अन्नधान्याची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. अत्यावश्यक कंपन्यांमधील उत्पादन थांबवण्यात आलेलं नाही. या मालाची वाहतूकही सुरू आहे. मात्र हा माल ज्या कंपनीचा आहे, त्या कंपनीचं नाव वाहनावर असावं, कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असावं, इतकीच खबरदारी घ्यायची आहे.

साठेबाजी खपवून घेणार नाही

मुंबईत पोलिसांनी धडक कारवाई करत मास्कचा मोठा साठा जप्त केला. या बद्दल पोलिसांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. पोलिसांकडून अशीच कामगिरी अपेक्षित असून संकटाचा कुणी संधी म्हणून उपयोग करू नये. अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही.

रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने रक्तदान शिबीर सुरू केलं आहे. त्यांचंही मी कौतुक करतो. याचप्रकारे आपण सगळे एकजुटीने या संकटाला सामोरे जावूया आणि त्यावर मात करूया, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा