Advertisement

आता पोलिसांचे दंडुके पडतील, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शेवटचा इशारा

स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका अशी विनंती आतापर्यंत राज्य सरकारकडून करण्यात येत होती, परंतु आता अशा बेपर्वा लोकांवर पोलिसांचे दंडुके पडतील, असा निर्वाणीचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

आता पोलिसांचे दंडुके पडतील, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शेवटचा इशारा
SHARES

कोरोनाचा संसर्ग (Coronavirus,) वाढू नये म्हणून राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी (curfew) लागू केली आहे. लोकांना घरात बसण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे. तरीही काहीजण घराबाहेर पडून धोका पत्करत असल्याचं दिसून आलं आहे. स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका अशी विनंती आतापर्यंत राज्य सरकारकडून करण्यात येत होती, परंतु आता अशा बेपर्वा लोकांवर पोलिसांचे दंडुके पडतील, असा निर्वाणीचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (state home minister anil deshmukh) यांनी दिला आहे. 

बेफिकीर लोकं बाहेर फिरताहेत

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी आपत्कालीन सेवा सुरूच आहेत. राज्यात एक-दोन नाही, तर चार महिन्यांहून जास्तकाळ पुरेल इतका अन्नधान्य आणि भाज्यांचा साठा आहे. तरीही काहीजण खरेदीच्या निमित्ताने बाजारात जाऊन गर्दी करत आहेत. खरेदीसाठी घरातील एखादा व्यक्ती गेला तरी पुरेस असताना गाड्यांमध्ये चार चार जण बाहेर जात आहेत. मोटरसायकलवरून तरूण आजूबाजूचा नजारा बघण्यासाठी चक्क फेरफटका मारत आहेत. असे १० ते १२ टक्के लोकं आहेत, त्यांना अजूनही परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं नाही. त्यांना आधी आम्ही विनंती करत होतो, पण आता पोलिसांचे दंडुके पडतील, तेव्हाच त्यांना समजेल. तशा सूचना आता आम्ही पोलिसांना दिल्या आहेत. 

हेही वाचा - Coronavirus Updates: मुंबईत ५ नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबधितांची संख्या ११० वर

इटलीची अवस्था बघा

केवळ ६ कोटींच्या इटली देशाची अवस्था काय झाली ते बघा, तिथं सरकार गाफील राहिलं, लोकांनीही सुरूवातीला गांभीर्याने घेतलं नव्हतं. यामुळे अतिशय प्रगत देश असूनही तिथं ६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हाच प्रकार आपल्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात घडला, तर परिस्थिती कशी असेल, याचा विचारही करवत नाही. यामुळे लोकांनी आताच सावध राहून घरात बसायला हवं. खरं तर तुमचं देशप्रेम दाखवायची हिच वेळ आहे. की तुम्ही देशाच्या भल्यासाठी घरात बसा आणि सरकारला सहकार्य करा.

सध्या व्हाॅट्सअॅपवरून जे अफवांचे मेसेज फिरताहेत त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सायबर क्राइम विभाग कार्यरत आहे. रहदारी होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या जिल्हांतर्गत सीमा देखील आम्ही बंद केल्या आहेत. संपूर्ण सरकार, प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी झटत आहे, ते सहकार्य करा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं.

हेही वाचा - मोदीजी ‘त्या’ ‘जन धन’ खात्यात ६ हजारांचं ‘धन’ टाका, मनसेची पंतप्रधानांकडे मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा