Advertisement

मोठ्या पडद्यावर झळकणार शिवसेना पक्षफुटी, शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी

धर्मवीर-2' चित्रपटाचे शुटींग सुरू

मोठ्या पडद्यावर झळकणार शिवसेना पक्षफुटी, शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी
SHARES

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजला. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, 'धर्मवीर 2' या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. त्यामुळे सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती. 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच 'धर्मवीर २'चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्यानं हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही.

पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर 'धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...' अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. 

चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र 'धर्मवीर २' च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा