Advertisement

आंबेडकर स्मारकाचं काम २०२० मध्ये पूर्ण होईल - मुख्यमंत्री


आंबेडकर स्मारकाचं काम २०२० मध्ये पूर्ण होईल - मुख्यमंत्री
SHARES

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक दादरच्या इंदु मिल येथे बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली असून हे काम १४ एप्रिल २०२० मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यासाठीच नव्हे तर देशासाठीही हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.


१२ एकरवर होणार स्मारक

चैत्यभूमी येथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं या जनतेच्या-आंबेडकर अनुयायांच्या मागणीनुसार इंदु मिल येथील १२ एकर जागेवर डाॅ. आंबेडकर स्मारक बांधण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे स्मारक मार्गी लावलं जात असून शापुरजी-पालनजी कंपनीला स्मारकाच्या बांधकामाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. तर प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या स्मारकासाठी ५०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.


बाबासाहेबांची ३६ मजली मूर्ती

एमएमआरडीएकडून स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली असून सध्या पाया खोदण्याचं काम सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत १४ एप्रिल २०२० पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल, असं जाहीर केलं आहे. तर या स्मारकात ३६ मजली इमारतीच्या उंचीची भव्यदिव्य अशी डाॅ. आंबेडकरांची मूर्ती असणार आहे.


मुंबईत बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह

दरम्यान शनिवारी, १४ एप्रिलला डाॅ. आंबेडकरांची १२७ वी जयंती मुंबईत उत्साहात साजरी होत आहे. मुंबईतील विविध ठिकाणी जंयतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक ठिकाणी जयंतीनिमित्त मिरवणूकाही काढण्यात येणार आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा