Advertisement

कलावंतांची अवस्था... कोणता झेंडा घेऊ हाती?


कलावंतांची अवस्था... कोणता झेंडा घेऊ हाती?
SHARES

राजकारण्यांच्या पक्षांतराच्या बातमीला आपल्यातले अनेक जण सरावले आहेत. राजकारण्यांचा कित्ता गिरवत नाट्य, चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातल्या नामवंतांनी केलेल्या पक्षांतराच्या बातम्या आता वाचायला आणि ऐकायला मिळणार आहेत. राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने आता कलाक्षेत्रावर सत्ता गाजवण्याची तयारी केली आहे. शिवसेना सिने व टेलिव्हिजन सेना, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या धर्तीवर आता ‘भाजप सिने, टीव्ही, नाट्य संघाचा दणक्यात शुभारंभ होऊ घातलाय. थोडक्यात आता भारतीय जनता पार्टीसुद्धा लाइटस्, साउंड, कॅमेरा आणि अॅक्शन ची भाषा बोलायला औपचारिक सुरूवात करत आहे. सीमा आणि रमेश हे देव दांपत्य, पुरुषोत्तम बेर्डे, निवेदिता बासू यांच्यासह भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आदींच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 12 मेला ‘भाजप सिने टीव्ही नाट्य संघा’च्या मुहूर्ताचा नारळ वाढवला जाणार आहे. राजकारण्यांमधले कलागुण जसे चर्चेचा केंद्रबिंदू ठरतात, तसेच कलावंतांमधलं राजकारणही चवीनं चर्चिलं जातं. दोन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्या नामवंतांसाठी भाजपानं नवा पर्याय उभा करून दिला आहे, हे खरंच, पण त्याबरोबरच बहुसंख्य कलाकारांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी करून ठेवली आहे, हे ही नाकारता येणार नाही.

आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुशांत शेलार आदी कलाकार शिवसेनेच्या तर भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे आदी कलावंत मंडळी मनसेच्या तंबूत आधीच दाखल झालेली आहेत. भाजपाने आपली अंगीकृत संघटना सुरू करताच दोन्ही पक्षांच्या ‘कलासेनां’मध्ये फितुरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल-परवापर्यंत काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र कलानिधीचा हुकमी पत्ता असलेला कलाकार सुशांत शेलार शिवसेनेच्या गोटात दाखल झाला आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची माळही त्याच्या गळ्यात पडली. सूत्रांच्या माहितीप्रमाणे काही चित्रपट, नाट्य, मालिका कलावंत आणि तंत्रज्ञ मंडळी येत्या काही दिवसांत पक्षांतर करणार आहेत. मनसेची साथ सोडून गेलेले काही कलावंत लवकरच ‘भाजप सिने टीव्ही नाट्य संघा’त दाखल होणार आहेत. शिवसेनेतही थोडीफार ‘हलचल’ होणार आहे.

कलावंत म्हणून सर्व पक्षांच्या निकट असलेल्या नामवंतांची मात्र आता खरी गोची होणार आहेत. तर 'आपण भलं आणि आपलं काम भलं' या वृत्तीच्या कलावंतांना निखळ कलानंद उपभोगता येणार आहे. ‘रिल’ लाइफबरोबर ‘रिअल’ लाइफमध्येही विविधांगी भूमिका जगण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या कलावंतांना मात्र विचार करून ‘भूमिका’ स्वीकारावी लागणार आहे. विशिष्ट पक्षाच्या प्रमुखांशी जिव्हाळ्याचे संबंधही त्रासाचे ठरतात. जुने संबंध जपण्यासाठी आपल्याला नाईलाजानं एका पक्षाच्या अंगीकृत सेनेचा सदस्य व्हावं लागलं, हे अवघड जागेवरचं दुखणंही मराठीतल्या दोन ‘चॉकलेटकुमारां’नी 'मुंबई लाइव्ह'जवळ अर्थातच नाव न सांगण्याच्या अटीवर उघड केलं. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेतल्या एका नामवंत कलाकार सदस्याने लवकरच आपण भाजपाच्या गोटात दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे. फक्त भाजपाच्या ‘संघा’त कोणत्या पदावर मांडवली करायची, हे ठरण्याचा अवकाश आहे.

मुळात कलाक्षेत्राला विशेषत्वाने चित्रपट व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी अशा संघटनांचा उदय झाला. निदान तसं भासवलं तरी गेलं. याबाबतीत शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांच्या ‘कलासेनां’नी चित्रपटव्यावसायिकांना निराश होऊ दिलं नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यशैलीबाबत काही तक्रारी आहेत. पण त्यांचं प्रमाण नगण्य आहे. चित्रपटसृष्टीचं मूळ जिथे घट्ट रुजलं आहे, त्या मुंबईच्या पालिकेवर वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता आहे. राज्य आणि केंद्रात सध्या भाजपाची सत्ता आहे. कुठल्या सत्तेला निष्ठा वाहाव्यात, या संभ्रमात कलावंत मंडळी आहेत. थोडक्यात, कोणता झेंडा घेऊ हाती? ही विवंचना कायम आहे.

आतापर्यंत आमच्या समस्यांची दखल शिवसेना आणि मनसेने घेतली आहे. आमची ‘बिरादरी’ दोन्ही पक्षांकडे आदराने पाहते. आता भाजपासुद्धा मैदानात उतरली आहे. हे चांगलं लक्षण आहे. आमच्या समस्यांची तड लावण्यासाठी भाजपाकडूनसुद्धा मनापासून प्रयत्न होईल, याची मला खात्री आहे. एक बाब लक्षात घ्यायला हवी. भाजपा राज्य आणि केंद्रात सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या पक्षाची संघटना नेहमीच बळकट असते. भाजपाकडे आमच्यातले काही कलावंत गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण कलावंतांनी कलेचीच सेवा करावी, कोणत्याही पक्षाच्या संघटनेत जाऊ नये असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.”

महेश कोठारे
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक



कोणत्याही राजकीय पक्षाने कलाक्षेत्रात शिरकाव करणे, यात गैर काही नाही. फक्त हेतू उदात्त असायला हवा. आमच्या अडचणी ओळखून त्यावर मार्ग शोधण्याचं काम होणं गरजेचं आहे. भाजपाचा हेतू उदात्त आहे, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मी कलावंत म्हणून सर्व पक्षांच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी असलेल्या कलावंतांना रंगभूमी आणि एकूण कलाविश्वाच्या हितासाठी झटत राहण्याची विनंती करेन.

अरुण नलावडे
अभिनेता, दिग्दर्शक, अध्यक्ष, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा