Advertisement

थेट मोदींच्या राज्यात शिवसेना देणार भाजपाला टक्कर


थेट मोदींच्या राज्यात शिवसेना देणार भाजपाला टक्कर
SHARES

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेसाठी काही नवे नाही. मुंबई महापालिका निवडणूक असो वा इतर निवडणुका शिवसेना आणि भाजपा राज्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आता गुजरातमध्ये देखील एकमेकांना टक्कर देणार आहेत. भाजपाची कोंडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता भाजपासमोर काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेचे आव्हान असणार आहे. 


भाजपासमोर आव्हान

गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणाऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. यंदा गुजरातमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी हवा निर्माण केली. राहुल गांधींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत आता शिवसेनेच्या रुपाने तिसरे आव्हान भाजपासमोर असणार आहे.


शिवसेना गुजरातमध्ये भाजपाची कोंडी करणार?

आरक्षण हा सुद्धा गुजरातमध्ये महत्त्वाचा मुद्दा असून, पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उघडपणे भाजपाविरोधात भूमिका घेतली आहे. हार्दिकचे शिवसेना आणि काँग्रेस दोघांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. शिवसेना गुजरातमध्ये तीस ते चाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे. गुजरातच्या सुरत आणि राजकोटमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. या पट्टयात शिवसेना आपले उमेदवार उभे करेल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.


गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरणार शिवसेना 

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली असून, रणनीती ठरवण्यासाठी ते अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. कालपर्यंत शिवसेनेचे नेते गुजरातमध्ये आम्ही मोदींना अपशकून करणार नाही असे म्हणत होते. पण अचानक शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला असून शिवसेनेने गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा