Advertisement

अन्नदात्यासाठी अन्नत्याग! १९ मार्चला राज्यभर अन्नत्याग आंदोलन

सोमवारी १९ मार्चला मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांसह राज्यभरातील ४० जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर धरणं आंदोलन धरत एक दिवसीय उपोषण अर्थात अन्नत्याग करण्यात येणार आहे. हे आंदोलन कुण्या संघटनेचं, पक्षाचं नसून हे आंदोलन सर्वसामान्य जनतेनं शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होत असल्याचं सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या आंदोलनात मुंबईसह राज्यभरातील जनतेनं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे.

अन्नदात्यासाठी अन्नत्याग! १९ मार्चला राज्यभर अन्नत्याग आंदोलन
SHARES

नाशिकवरून मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या लाल वादळानं राज्य सरकारला तर हलवलंच; पण देशभरातील जनतेलाही आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. जो बळीराजा देशभरातील नागरिकांचं पोट भरतो, त्या बळीराजाचं रोजचं जगणंही किती खडतर आहे, त्याच्यासमोर समस्यांचा किती मोठा डोंगर आहे, हे किसान लाँग मार्चच्या निमित्तानं समोर आलं. किसान सभेच्या लाँग मार्चनंतर मुंबईसह राज्यभरातील जनतेकडून १९ मार्चला एका अनोख्या संकल्पनेद्वारे शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ही संकल्पना म्हणजे 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग'.

सोमवारी १९ मार्चला मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांसह राज्यभरातील ४० जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर धरणं आंदोलन धरत एक दिवसीय उपोषण अर्थात अन्नत्याग करण्यात येणार आहे. हे आंदोलन कुण्या संघटनेचं, पक्षाचं नसून हे आंदोलन सर्वसामान्य जनतेनं शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होत असल्याचं सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या आंदोलनात मुंबईसह राज्यभरातील जनतेनं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे.

कशासाठी अन्नत्याग?

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यानं पत्नी आणि आपल्या चार मुलांसह जेवणातून विष घेऊन आत्महत्या केली होती. ही तारीख होती १९ मार्च १९८६. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असून हा बोजाचा पुढच्या पिढ्याही फेडू शकत नाहीत आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकारी धोरणं असल्याची सुसाईड नोट लिहून या शेतकऱ्यानं कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येला ३१ वर्षे पूर्ण झाली तरी शेतकऱ्यांची परिस्थिती 'जैसे थे' आहे. इतकंच काय साहेबराव करपेंपासून अर्थात १९ मार्च १९८६ पासून २२ मार्च २०१८ पर्यंत राज्यात तब्बल ७५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांकडं सर्वपक्षीय दुर्लक्ष

आघाडीचं सरकार असो वा युतीचं सरकार कुणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नसल्याचं या आकड्यातून सिद्ध होत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि तमाम शेतकरी बांधवांच्या पाठिशी उभं राहण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक देण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

जिथं असाल तिथं

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील धरणे आंदोलनात सहभागी होत अन्नत्याग करत शेतकऱ्यांना पाठिंबा देता येणार आहे. त्याचवेळी ज्यांना या धरणे आंदोलनात सहभागी होता येणार नाही त्यांनी जिथे असला तिथे एक दिवसीय उपोषण करत शेतकऱ्यांना साथ द्यावी, असंही आवाहन पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केलं.

हेही वाचा-

शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, मिळालं लिखित आश्वासन

पायाच्या जखमेपेक्षा मनाची जखम मोठी, शेतकरी आजीची व्यथा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा