Coronavirus cases in Maharashtra: 223Mumbai: 88Pune: 29Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 38BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मुंबईचा किंग कोण?


मुंबईचा किंग कोण?
SHARE

देशभरात ७ टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तासच शिल्लक राहिलेत. चौथ्या टप्प्यात नाशिक, धुळे, शिर्डी, शिरूर, मावळ आणि मुंबईसह एकूण १७ जागांसाठी मतदान होत असलं, तरी सर्वांचं लक्ष लागलंय ते मुंबईकडं. मुंबईत प्रामुख्याने युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर होतेय. या टकरीत कुणाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होणार आणि कोण आपला गड राखणार? यावरूनच मुंबईचा किंग कोण? हे ठरणार आहे.

लोकसभेच्या एकूण ५४२ जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी विविध पक्षांचे आणि अपक्ष असे हजारो उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ (८०) महाराष्ट्रातून सर्वाधिक ४८ खासदार संसदेत पाठवले जातात. त्यामुळे सहाजिकच सत्ताधाऱ्यांनी इथं आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीय. यामागचं कारणंही स्पष्टच आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४१ जागांवर मतदारांनी युतीच्या बाजूने कौल दिला होता. तर मुंबईतील ६ पैकी ६ जागांवर युतीचा भगवा फडकला होता.

युतीच्या यशाचा झेंडा राज्यात असाच फडकत राहावा यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्यात २ अशा रितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ प्रचारसभांचं नियोजन भाजपाने केलं. त्यातील एक सभा नुकतीच वांद्र्यातील बीकेसी मैदानावर झाली. या प्रचारसभेत मोदींनी सर्वसामान्य मुंबईकरांना भावनिक साद घालत पुन्हा एकदा भाजपाला निवडून देण्याचं आवाहन केलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचं हे वर्चस्व तोडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून जिंकून येणं नेहमीच प्रतिष्ठेचं मानलं जातं. मोदी लाटेत राष्ट्रवादाचा भगवा झेंडा खांद्यावर घेतलेल्या काॅस्मोपॅलिटन मुंबईतून कधीकाळी कष्टकऱ्यांचा, कामगारांचा बुलंद आवाज संसदेत पोहोचवला जात होता. जाॅर्ज फर्नांडिस, अहिल्या रांगणेकर, काॅ. डांगे, दत्ता सामंत, मृणाल गोरे, वामनराव महाडिक, मुरली देवरा, राम नाईक, सुनील दत्त, गुरूदास कामत इ. नेत्यांचं यांत मोठं योगदान होतं. परंतु २०१९ ची निवडणूक प्रामुख्याने प्रखर राष्ट्रवाद विरूद्ध उदारमतवाद या विचारसरणीवर आधारीत असल्याने या निवडणुकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय.

दक्षिण मुंबईतून १७ उमेदवार, दक्षिण मध्य मुंबईतून ३० उमेदवार, उत्तर मध्य मुंबईतून २७ उमेदवार, उत्तर पश्चिम मुंबईतून २७, उत्तर मुंबईतून २२ उमेदवार आणि इशान्य मुंबईतून सर्वाधिक ३३ असे एकूण १५६ उमेदवार मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यापैकी ६ उमेदवार मतमोजणीनंतर देशाच्या राजधानीत जाऊन बसणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवाराने चांगलाच जोर लावला. यातील प्रमुख उमेदवारांच्या लढतीवर आपण नजर टाकूया.

दक्षिण मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे माजी खासदार तसंच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेत हा मतदारसंघ थेट शिवडीपर्यंत पोहोचल्याने वाढलेला मराठी टक्का आणि मोदी लाटेत शिवसेनेचे सावंत जिंकून आले होते. परंतु महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी इथं समाधानकारक झालेली नाही. नोटाबंदीमुळे इथला व्यापारी नाराज आहे. मेट्रोच्या वाटेत येणाऱ्या गिरगावकरांचा पुनर्वसनाचा प्रश्न खोळंबलेला आहे. कोस्टल रोडला असलेला मच्छिमारांचा विरोध, बीडीडी चाळकऱ्यांनी पुनर्वसनाच्या प्रश्नावर केलेला निषेध सावंत यांना भारी पडू शकतो. त्या तुलनेत देवरा यांना मुकेश अंबानीसह इतर व्यापाऱ्यांनी दिलेला पाठिंबा, काँग्रेससोबतच मनसेचं संघटनात्मक पाठबळ याचा देवरा यांना फायदा होऊ शकतो.

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. दादर माहीम भागातील मध्यमवर्गीयांमध्ये शेवाळेंच्या कामाविषयी नाराजी असली, तरी मातोश्रीच्या जवळ असलेल्या शेवाळेंचा या मतदारसंघावर बऱ्यापैकी होल्ड आहे. याउलट काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा म्हणावा तसा जनसंपर्क नाही. धारावी वगळता इतर भागातून त्यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत त्यांनाही खात्री देता येणार नाही. इथं मनसेची मतं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.

उत्तर मध्य मुंबईत जातीय समीकरणाचा फॅक्टर मोठा ठरणार आहे. एका बाजूला वांद्र्यासारखा उच्चभ्रू मतदार तर दुसऱ्या बाजूला कुर्ला, धारावीतील कष्टकरी समाज असा विभागलेला मतदासंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या प्रिया दत्त पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. प्रिया दत्त यांचं भवितव्य मुस्लिम, ख्रिश्चन, उत्तर भारतीय आणि दलित मतांवर अवलंबून आहे. तर पूनम महाजन यांची भिस्त मराठी, गुजराती-मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांवर असेल.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे संजय निरूपम शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना तगडं आव्हान देतील असं मानलं जात आहे. मागील ५ वर्षांत किर्तीकर यांचा जनसंपर्क म्हणावा तसा नसल्याने ते आपला मतदासंघ कितपत राखतील याविषयी शंका उपस्थित होत आहे. याउलट निरूपम यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. उत्तर भारतीय मतदारांचा त्यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मराठी आणि गुजराती मते या मतदारसंघासाठी मोठा फॅक्टर ठरू शकतो.

उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरला राजकारणाचा अनुभव नसला, तरी मागील काही दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करत तिने भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या तोंडाला फेस आणला आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने मराठी आणि गुजराती मतांचा प्रभाव राहणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी निरूपम यांना साडेचार लाख मतांनी हरवलं होतं. त्यामुळं यंदा मराठी मतांवर हक्क सांगणारी ग्लॅमरस उर्मिला शेट्टींना कशी लढत देते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.

ईशान्य मुंबई मतदासंघात भाजपाचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात लढत आहे. किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर कोटक यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. कोटक यांना शिवसेनेकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. त्याशिवाय गुजराती आणि राजस्थानी नागरिकांमध्येही त्यांचा चांगला प्रभाव आहे. याउलट संजय दिना पाटील यांची भिस्त केवळ मराठी मतांवर असणार आहे. कोटक यांच्यासाठी ही लढत सोपी मानली जात आहे.

येत्या २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर देशातील सत्तास्थापनेत मुंबईतील उमेदवारांचं नेमकं योगदान स्पष्ट होईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या